scorecardresearch

जळगाव : यावर तालुक्यात भीषण तिहेरी अपघात ; पाच जण ठार, सहा जण जखमी

जखमींवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू

jalgaon Accident

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर येथे बाजारासाठी बकर्‍या घेऊन जाणार्‍या मालवाहू मोटारीला विरुद्ध बाजूने येणार्‍या भरधाव मालमोटारीने उडविले. त्यात पाच जण ठार, तर सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना नशिराबाद (ता. जि. जळगाव) येथील महामार्गावरील उड्डाणपुलावर आज (बुधवारी) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

जळगावसह नशिराबाद (ता. जि. जळगाव) येथून बकर्‍या भरून मालवाहू मोटार (एमएच ४३, एडी १०५१) यावल तालुक्यातील फैजपूर येथे बुधवारी भरणार्‍या बाजारात जात होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबादजवळील टोल नाक्याच्या पुढे असणार्‍या उड्डाणपुलाजवळ समोरून भुसावळकडून विरुद्ध बाजूने भरधाव येणार्‍या मालमोटारीने (एमएच ०९, एचजी ९५२१) मालवाहू मोटारीला जोरदार धडक दिली. यानंतर मालमोटार अजून एका मोटारीला धडकली. या भीषण तिहेरी अपघातात पाच जण ठार, तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला.

अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, अमोल साळवे, किरण बाविस्कर, रवींद्र इंधाटे, अतुल महाजन यांच्यासह कर्मचार्‍यांनी, तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अद्याप मृत झालेल्यांची ओळख पटलेली नव्हती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jalgaon terrible triple accident in yavar taluka five killed six injured msr

ताज्या बातम्या