पैशांसाठी अल्पवयीन मुलीचा केला तीनवेळा विवाह; चौथ्या वेळी मात्र…; सख्खी आई आणि भावाच्या कृत्यामुळे खळबळ

मुलीने लग्नाला विरोध केला असता तिच्या भावांनी तिला मारहाण केली.

भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी परिसरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिची आई व भावानेच पैसे घेऊन तीन वेळा बालविवाह करून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान घरच्यांची पुन्हा चौथ्यांदा बळजबरीने विवाह लावून देण्याची तयारी सुरु असल्याचे समजताच पीडित मुलीने तेथून पळ काढून पोलीस ठाणे गाठत आपली सुटका करून घेतली. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून आई , एक भाऊ , तीन पतींसह बारा जणांविरुद्ध भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे . दरम्यान , एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे समजते. या विषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह अंदाजे तीन वर्षांपूर्वी तिच्या आई आणि भावांनी शेंदूर्णी येथील एका मुलाशी ( ता. जामनेर,जिल्हा जळगाव ) येथे पैसे घेऊन लावून दिला होता. तिथं एक महिना राहिल्यानंतर माहेरच्यांनी तिला परत आणून घेतले व पुन्हा सासरी पाठविले नाही. त्यानंतर आठ महिन्यांनी पुन्हा पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील एका व्यक्तीकडून पैसे घेऊन दुसरा विवाह लावून दिला. येथे तीन महिने राहिल्यानंतर तिच्या भावांनी तिला परत भोकरदनला बोलावून घेतले व त्यानंतर पुन्हा पाच महिन्यांनी भोकरदन शहरातील एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तिसरा विवाह लावला. त्याच्यासोबत पीडित मुलगी औरंगाबाद येथे एक वर्ष राहिली. मात्र, पतीसोबत वाद झाल्याने पीडित मुलगी चार महिन्यांपूर्वी माहेरी भोकरदन येथे आलेली होती .

दरम्यान, आई व भावांकडून पुन्हा चौथ्या लग्नाची तयारी सुरू असल्याचे जळगाव जिल्ह्यातील पाहुणे पाहायला येणार असल्याचे तिला समजल्याने पीडित मुलीने चौथ्या लग्नाला विरोध केला असता तिच्या भावांनी तिला मारहाण केली. त्यामुळे आपण लग्न केले नाही तर आपल्या जीवाला धोका असल्याचे तिच्या लक्षात येताच तिने चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क केला . पोलिसांनी लगेच तिला भेटून चौकशी केली . या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून आई , दोन भाऊ , तीन पतीसह १२ नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jalna bhokardan minor girl married thrice for money by her mother and brother vsk