सोमवारी भंडारा जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने मोठय़ा राजकीय वादाला तोंड फोडले आहे. ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोललो नसून गावातील गुंडाबाबत बोललो आहे’, असा दावा पटोले यांनी केलाय. मात्र पटोले यांच्या या वक्तव्यानंतर राज्यामधील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपाने मंगळवारी राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलने, निदर्शने करुन नाना पटोलेंच्या वक्तव्याचा निषेध केला. अनेक ठिकाणी नाना पटोलेंच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, जालन्यातील भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षांनी तर नाना पटोलेंची जीभ कापणाऱ्याला एक लाख रुपयांचं रोख बक्षीस देण्याची घोषणा करत असल्याचं वादग्रस्त विधान केलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पटोलेंवर केली टीका
जालना भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सुजीत जोगस असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. “नाना पटोलेंची मस्ती वाढलीय. ती कशामुळे वाढलीय तर राज्यामध्ये अराजकता माजवणारं काँग्रेसचं सरकार आलंय. त्यामुळेच नाना पटोलेंना बळ मिळालं आहे. याच कारणामुळे नाना पटोले देशातील आपल्या यशस्वी पंतप्रधानांना काहीही म्हणतायत. मारहाण करण्याची भाषा देखील बोलली गेली, ही चुकीची भाषा आहे,” असं जोगस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय.

एक लाखांचं बक्षीस
तसेच पुढे बोलताना, “मी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने आवाहन करतो की नाना पटोलेची जीभ कापणाऱ्याला एक लाख रोख रक्कमेचं बक्षिस आम्ही आज आमच्यावतीने घोषित करतो. महाराष्ट्रामध्ये जो कोणी या नाना पटोलेची जीभ कापून आणेल त्याला एक लाख रुपये भाजपा युवा मोर्चा जालनाच्यावतीने आम्ही रोख रक्कम स्वरुपात देणार आहोत,” असं जोगस यांनी म्हटलंय.

नाना पटोले काय म्हणाले?
‘‘मी एवढ्या वर्षांच्या राजकारणात एकही शाळा काढली नाही किंवा ठेकेदारी केली नाही. जो आला, त्याला वाटत गेलो, म्हणूनच मोदींना मारू शकतो, शिवी देऊ शकतो. म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले नाही,’’ असं नाना पटोले म्हणाले. त्यांच्या या विधानाची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहे.

नाना पटोलेंचे स्पष्टीकरण…
“जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवले जात आहे त्यामध्ये लोक माझ्या सभोवताली गोळा झालेले आहेत. सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरु आहेत. निवडणुकांच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते. त्या गावगुंडाला मी बोलूही शकतो आणि मिळाला तर मारुही शकतो. तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल नाही,” अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

काँग्रेसने फेटाळले आरोप
दरम्यान, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मात्र पटोले यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. पटोले यांचे विधान पंतप्रधान मोदी यांच्यासंदर्भातील नव्हते, असा दावाही त्यांनी केला. पटोले हे भाषण देत नव्हते तर ते लोकांच्या गराडय़ात होते. लोक तक्रारी करीत होते. भंडारा जिल्ह्यात ‘मोदी’ असे टोपण नाव असलेला गावगुंड आहे. त्याच्यासंदर्भात ते बोलले. शिव्या देणे, मारणे, संपवणे हे काँग्रेसची संस्कृती नाही. ती भाजपाची संस्कृती आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी पटोले यांच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला केला होता. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भाजपने ‘चोर’ म्हटले होते. काल चंद्रकांत पाटील हे संजय राऊत यांच्याबद्दल काय बोलले हे सर्व महाराष्ट्राने बघितले, याकडे लोंढे यांनी लक्ष वेधले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalna bjp leader offered 1 lakh rs bounty for cutting nana patole tongue scsg
First published on: 19-01-2022 at 08:23 IST