जालना  – जालना शहरात पुन्हा एकदा तलवारी सापडल्या आहेत. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या महावीर चौक भागातील एका तयार कपडे विक्री करणाऱ्या दुकानातून पोलिसांनी २१ तलवारी जप्त केल्या आहेत. होळी, धुळवडीचा सण दोन दिवसांवर असून, या पार्श्वभूमीवर तलवारी सापडल्याने खळबळ उडाली आहे.

महावीर चौकातील ‘जय मातादी मेन्स वेअर’ या दुकानात एका व्यक्तीकडे तलवार असल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन सानप यांना गोपनीयरित्या मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी दोन पंचांसह या दुकानावर जाऊन चौकशी केली. त्यावेळी तेथे त्यांना माहिती मिळालेल्या वर्णनानुसार व्यक्ती आढळून आला. मनीष दिलीपकुमार निहलानी (वय ४१) असे त्याचे नाव असून जालना शहरातील अजिंठान‌गर भागातील शिव अपार्टमेन्टस् येथील तो रहिवाशी आहे.

 तलवारीच्या संदर्भात त्याने प्रारंभी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. दोन पंचांसमक्ष दुकानाची झडती घेतली असता तिसऱ्या मजल्यावर पोलिसांना २१ तलवारी सापडल्या. यापैकी १३ तलवारी मोठ्या तर  ८ तलवारी लहान आकारातील आहेत. चॉकलेटी, लाल आणि पांढऱ्या रंगांच्या म्यानामध्ये या तलवारी आढळून आल्या होत्या. यापैकी मोठ्या तलवारींची किंमत १९ हजार ५०० रुपये तर लहान तलवारींची किंमत ६ हजार ४०० रुपये आहे.

पोलिसांनी या तलवारी जप्त केल्या असून आरोपी मनीष निहलानी याच्या विरुद्ध सदर बाजार पोलिसांत हत्त्यार कायद्यातील कलमांन्वये गुन्हा नोंदविला आहे.

जालना शहरात तलवारी सापडल्याची बाब नवी नसून, यापूर्वीही गतवर्षामध्ये दोन ते तीनवेळा तलवारी आढळून आलेल्या आहेत. शुक्रवारी सापडलेल्या तलवारींमागचा उद्देश अद्याप पोलीस तपासातून पुढे आलेला नाही. मात्र दोन दिवसांवर होळी व तीन दिवसांवर धुळवड असल्याने त्या वेळी काही करण्याचा विचार कोणी करत आहे, या दृष्टीनेही तपास करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.