जालना – धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू करण्याकरिता आंदोलक दीपक बोऱ्हाडे रविवारी दुपारी जालना येथून रवाना झाले. सोमवारपासून (१६ मार्च) ते मुंबईत बेमुदत उपोषणास बसणार आहेत.

मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना बोऱ्हाडे म्हणाले, मागील बारा वर्षापासून आमचा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा सुरू आहे. आम्हाला या संदर्भात अनेकदा आश्वासने देण्यात आली परंतु प्रत्यक्षात मागणी पूर्ण झाली नाही. आझाद मैदानावर सुरू करण्यात येणाऱ्या बेमुदत उपोषणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आपणास विधानभवनात चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळीही आपण मुख्यमंत्र्यांकडे  धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याच्या संदर्भात आग्रही मागणी केली.

सोमवारी (१६ मार्च) श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती असून या दिवशी आपण बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत. आझाद मैदानावर. जयंती साजरी करण्यात येणार असल्याने धनगर समाज बांधव त्या ठिकाणी मोठ्या संख्येने येणार आहेत. राज्यातीलच नव्हे तर देशभरातील धनगर समाज बांधव त्या ठिकाणी येणार आहेत- गेल्या १७ सप्टेंबर रोजी आपण जालना शहरात आरक्षणाच्या मागणीसाठी केलेले उपोषण सोडले होते परंतु त्यावेळी सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. मागील २1 जानेवारी रोजी मुंबईस उपोषणास बसण्यासाठी निघण्याच्या तयारीत असताना जालना येथे पोलिसांनी आपणास प्रतिबंध केला होता. आता मात्र पोलिसांनी तसे दडपण आणू नये’ असे बोऱ्हाडे म्हणाले.

यापूर्वी सध्याच्या सत्ताधारी नेत्यांनी आम्हाला आरक्षणाच्या संदर्भात अनेकदा आश्वासने दिलेली आहेत. बारामती येथील जाहीर सभेत सध्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फड‌णवीस यांनी राज्यात सत्ता आली तर मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीसमोर हा विषय आणून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. शिवाय माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी पंढरपूर येथील जाहीर सभेत आरक्षणाच्या संदर्भात आश्वासन दिले होते. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनीही सोलापूर येथील जाहीर सभेत धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये प्रवेश करण्याच्या अनुषंगाने आश्वासन दिले होते. अनेकदा आश्वासने देण्यात आली तरी प्रत्यक्षात मात्र निर्णय मात्र होत नाही. अनेक वर्षे धनगर समाज अनुसूचित जमातींम‌ध्ये समावेशाची मागणी करीत आहे. त्यामुळे आता सोमवारी सकाळी (१६ मार्च) सकाळी दहा वाजता मुंबईतील आझाद मैदानावर श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी करून आपण बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे बोऱ्हाडे यांनी सांगितले.