जालना – पेट्रोल आणि डिझेलचा तसेच घरगुती वापराच्या एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यासारखे चित्र जालन्यात पाहायला मिळत असून पेट्रोल पंप त्याचप्रमाणे गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सीज समोर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.
जिल्हयात जवळपास सव्वाशे पेट्रोल आणि डिझेल पंप आहेत. तर घरगुती वापराच्या एलपीजी गॅसचे वितरण करणाऱ्या एकतीस एजन्सीज आहेत. दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पेट्रोल आणि डिझेल वितरणाच्या संदर्भात पंपचालकांना कांही सूचना केल्या आहेत. त्यानुसार एका दुचाकीसाठी दोनशे रुपयांपर्यन्तचेच पेट्रोल देता येणार आहे. तर तीन चाकी आणि चार चाकी वाहनांमध्ये दोन हजार रुपयांपचेच पेट्रोल तसेच डिझेल भरता येणार आहे. बाटली किंवा अन्य साधनांतून पेट्रोल-डिझेल देऊ नये असे असे पंचाचालकांना कळविण्यात आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल-डिझेलची कंपनीकडे केलेली मागणी, प्राप्त झालेला साठा आणि शिल्लक साठा दर्शविणारा फलक दर्शनी भागात लावणे पंप चालकांना बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान, देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जालना जिल्ह्यात एलपीजी गॅस व इंधन टंचाई निर्माण झाल्याची अफवा पसरली असून, यामुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणत गर्दी करत आहेत. मात्र, जिल्ह्यात एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू आहे. अलीकडे काही ठिकाणी गॅस व इंधन टंचाईबाबत चूकीच्या अफवा पसरत असल्याने, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. मात्र, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले आहे.
मित्तल यांनी सांगितले की, जिल्ह्यातील काही पेट्रोल पंप चालकांनी गॅस व तेल कंपन्यांना देयके उशिरा अदा केल्याने त्यांना इंधन साठा मिळण्यास थोडा विलंब झाला होता. याचा चुकीचा अर्थ काढून शहरात आणि जिल्ह्यात एलपीजी गॅस व इंधन संपल्याच्या अफवा पसरल्यामुळे अनेक नागरिक वाहनांमध्ये अतिरिक्त साठा करण्यासाठी पेट्रोल पंपांवर गर्दी करत असल्याचे चित्र दिसत आहे.
सर्व तेल कंपन्यांचे विक्री अधिकारी आणि प्रतिनिधींना इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा भासणार नाही, याची जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण काळजी घेतली जात आहे. समाज माध्यमे किंवा इतर माध्यमांतून एलपीजी गॅस व इंधन टंचाईबाबत चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणारांच्या विरुद्ध प्रशासनामार्फत कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात घरगुती गॅस आणि पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता शांतता आणि संयम राखावा. जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींकडे घरगुती एलपीजी गॅसचा पर्याप्त साठा उपलब्ध आहे. तसेच पेट्रोल पंपांवरही पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरू असून, कोणतीही कमतरता भासणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. पुरवठा साखळी सुरळीतपणे कार्यरत असल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन साठेबाजी करू नये. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मित्तल यांनी सांगितले.
