जालना – जिल्ह्यातील घनसावंगी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस (आयटीआय) राज्य पातळीवरील प्रथम पारितोषिक मिळाले आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईतील शासकीय तांत्रिक प्रशालेत नुकताच पार पडला.घनसावंगी येथील डाॅ. श्यामाप्रसादप्रसाद मुखर्जी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना १९९७ मध्ये झाली. २०२३-२०२४ मधील कार्याबद्दल या संस्थेस राज्यातील सर्वात्कृष्ट संस्था पुरस्कार मिळाला आहे.या वर्षात संस्थेत १०० टक्के म्हणजे १५२ प्रवेश झाले होते. विद्यार्थी गळतीचे प्रमाण ७.६६ टक्के होते. उत्तीर्णं प्रमाण ९५.४७ टक्के होते. यापैकी ९२.५९ टक्के विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला किंवा त्यांनी स्वयंरोजगार सुरु केला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील धूत ट्रान्समिशन, धूत इलेक्ट्रीकल्स सिस्टीम तसेच जीटीटी फाऊंडेशन पुणे आणि जालना येथील विनोदराय इंजिनिअर्स या उद्योगांच्या सोबत विधार्थी प्रशिक्षणाचे सामंजस्य करार संस्थेने केलेले आहेत. सुसज्ज इमारतीसह ग्रंथालय आहे. महिला कर्मचारी आणि महिला प्रशिक्षणार्थीसाठी सॅनेटरी नॅपकीन व्हेंडिग मशिन’ ची व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थेतील विद्यार्थीनांना अल्पसंख्यांक मुलीच्या वसतिगृहात मोफत निवास आणि भोजन सुविधा ऊपलब्ध आहे . जिल्हा पातळीवरील तंत्र प्रदर्शनाचे आयोजन संस्थेने केलेले आहे. प्रशस्त खेळाचे मैदान आणि आऊटडोअर तसेच इनडोअर जिम सुविधा उपलब्ध आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने पुरस्कार वितरण करण्यात आले. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले. या पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह व पाच लाख रुपयांचा समावेश आहे.घनसावंगी येथील प्राचार्य एन. के. सर्जे तसेच संस्थेचे तत्कालीन प्राचार्य डी. एम. राठोड आणि अधिकारी व कर्मचारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
