जालना :  व्यापाठी प्रसिद्ध असलेल्या जालना जिल्ह्याची ओळख मागील पाच-सहा दशकांत बियाणे, पोलाद आणि मागील काही वर्षांत रेशीम कोष उत्पादनासाठी झालेली आहे. तुती लागवडीपासून रेशीम कोष उत्पादनापर्यंतची साखळी विकसित होत असताना विकासाचे चक्र ‘सीड, सिल्क आणि स्टील’ असे फिरते आहे. 

जालना शहराच्या औद्योगिक वाटचालीत बांधकामासाठी लागणार्या लोखंडी सळ्या तयार करणार्या उद्योगांचा मोठा वाटा आहे. या उद्योगास मोठ्या प्रमाणावर विजेची आवश्यकता असते. २०२५-२०२६ वर्षातील दरडोई औद्योगिक वीज वापरात जालना जिल्हा राज्यात तिसर्या क्रमांकावर आहे. जालना औद्योगिक वसाहतीमधील बांधकामासाठी लागणार्या लोखंडी सळ्या उत्पादित करणार्या उद्योगांचे वार्षिक वीज बील हजार ते दीड हजार कोटींच्या दरम्यान असल्याने एकूण वीज वापरात हा जिल्हा राज्याच्या २०२५-२०२६ च्या आर्थिक पाहणीत ठळकपणे दिसून येतो.

जिल्ह्यात अडिचशे खासगी रुग्णालये

वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात सार्वजनिक आणि आरोग्य सुविधांमध्ये वाढ झाली आहे. २०२४-२०२५ च्या अधिकृत माहितीनुसार जिल्ह्यात १४ शासकीय रुग्णालये, ४४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २२३ आरोग्य उपकेंद्रे आहेत. सार्वजनिक आणि शासन सहाय्यित रुग्णालयांतील खाटांची संख्या १ हजार ७४१ असून, त्यापैकी ६७३ स्त्री रुग्णांसाठी आहेत.

जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांची संख्या ५३० असून, त्यामधील खाटांची संख्या ९ हजार ३३४ आहेत. यापैकी २७७ रुग्णालये जालना शहर आणि तालुक्यात आहेत. खासगी रुग्णालयांतील एकूण उपलब्ध खाटांपैकी निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे ५ हजार ८०१ जालना शहरात आहेत. जालना महानगरपालिकेचे दवाखानेही जालना शहरात आहेत. छत्रपती संभाजीनगर शहराच्या लगत असलेल्या या जिल्ह्यातील रुग्णांना तेथील आरोग्य सुविधांचा लाभही मोठ्या प्रमाणावर होतो. 

तुती लागवडीचे पाच हजार एकरचे उद्दिष्ट

रेशीम कोषांसाठी आवश्यक असणार्या तुती लागवडीसाठी या जिल्ह्यात शासकीय पातळीवर गेल्या काही वर्षांपासून विशेष प्रयत्न केले जात आहेत. ‘मेरा रेशीम-मेरा अभियान’ या शासनाच्या कार्यक्रमात राज्यातील जालना जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. शेती व्यवसायास जोडधंदा देणार्या तुती लागवडीचे येत्या वर्षांत आणखी पाच हजार एकरचे उद्दिष्ट आहे. जालना येथील रेशीम कोष बाजारपेठेत मागील आठ वर्षांत जवळपास ३२ हजार क्विंटल आवक झालेली असून, त्याची किंमत १३७ कोटी रुपये आहे.