जालना : घराच्या जवळच गांजाची लागवड करून त्याची विक्री करण्याच्या संदर्भात पोलिसांनी सात जणांवर गुन्हा नोंदविला असून एकास अटक केली आहे. आरोपीकडून तीन लाख ६४ हजार रुपये किंमतीना गांजा जप्त केला आहे. याशिवाय एक स्कॉर्पिओ वाहन आणि दोन दुचाकी वाहनेही पोलिसांनी जप्त केली.
गोंदी पोलिसांना गस्त घालताना एक विना क्रमांकाचे दुचाकी वाहन आढळून आले होते. या दुचाकी चालकाने ज्याच्याकडून हे वाहन विकत घेतले होते त्याच्या चौकशीसाठी पोलीस गोंदी तांडा येथे गेले होते. तेथे पोलिसांवर दगडफेक झाली होती. याप्रकरणातील चौकशीत गोंदी तांडा येथे घराजवळच गांजाची लागवड करून त्याची विक्री होत असल्याचे आढळून आले. गांजा लागवड आणि विक्रीच्या संदर्भात पोलिसांनी गंगाराम सावळा पवार यास अटक केली आहे .
याप्रकरणी सात पेक्षा अधिक आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून त्यामध्ये महिलांचाही समावेश आहे. या आरोपींवर राज्यात त्याचप्रमाणे परराज्यांत चोरी, घरफोडी, पाकीटमारी, दरोडे इत्यादी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथकांची स्थापना केली आहे.