जालना : जिल्ह्यातील पीकहानी अनुदान वितरणात झालेल्या गैरप्रकार प्रकरणी जिल्हाधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आणखी सात तलाठी निलंबित केले आहेत. त्याचप्रमाणे अन्य चार महसूल कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. यामुळे निलंबित तलाठी आणि महसूल कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आता २१ झाली आहे.
अतिवृष्टीमुळे झालेली पीकहानी आणि जमीन खरडून झालेल्या नुकसानीबद्दल एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२४ दरम्यान शासनाने नऊ आदेश काढून अनुदान वितरणाचा निर्णय घेतला होता. या अनुदान वितरणाची अंबड आणि घनसावंगी तालुक्यांतील तपासणी जवळपास पूर्ण झाली असून, त्यामध्ये अनेक गैरप्रकार चौकशी समितीस आढळून आले आहेत.
शेती नसताना अनुदान देणे, दोनदा अनुदान देणे, शासकीय जमिनीवर अनुदान देणे इत्यादी प्रकारे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. तलाठी, ग्रामविकास अधिकारी, कृषी सहायक इत्यादी ९० कर्मचाऱ्यांना यासंदर्भात चौकशी समितीने स्पष्टीकरण मागितले आहे.