जालना – जालना जिल्ह्यात येत्या काही दिवसांत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून येत्या गुरुवारी ( १९ मार्च ) जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.त्यामुळे विजांचा कडकडाट आणि वादळी वारे सुरू असताना घराबाहेर पडणे टाळावे, झाडे तसेच विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर आणि उंच बांधकामांपासून दूर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मेघगर्जना होत असताना मोकळ्या मैदानात किंवा झाडाखाली उभे न राहता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, वीज कडाडत असताना घरातील विद्युत उपकरणांचा वापर शक्यतो टाळावा, शेतकऱ्यांनी कापणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावीत, पाळीव प्राण्यांना सुरक्षित गोठ्यात बांधावे, वाहनचालकांनी पावसाच्या वेळी वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवावा आणि सुरक्षित ठिकाणी वाहन उभे करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यात सध्या गव्हाचे पीक काढणीच्या अवस्थेत असून, हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गुरुवारी गुढी पाडव्याचा महत्त्वाचा सण असून, मराठी नववर्ष आणि कृषिक्षेत्रात शेतकऱ्यांसाठी या दिवशी नवा सालगडी नियुक्त करण्याची प्रथा आहे. याच दरम्यान, गहू पीक काढण्यासाठी धावपळ करावी लागणार असून, तातडीने हार्वेस्टर उपलब्ध झाला नाही तर पंचाईत होऊन गव्हाचे सोन्यासारखे आले पीक भिजण्याची शक्यता आहे.
पीक भिजले तर बाजारभाव कोसळण्याच्या चिंतेने शेतकऱ्यांना घेरले आहे. आधीच यंदा गव्हाचे दर शेतकऱ्यांच्या वाटेला अवघे दोन हजार दोनशे ते चोवीसशे रुपयांपर्यंतच आले असून बाजार समितीत २६०० ते २८०० पर्यंत आहेत. परिणामी अवकाळीने दर गडगडतील, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
