जालना : जालना जिल्हयात रविवारी दुपारनंतर आणि रात्री कांही भागात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका उन्हाळी पिकांसह फळबागांना बसला .रविवारी वीजा कोसळल्यामुळे भोकरदन तालुक्यात दोन जण मृत्युमुखी पडलेअसून आठ गुरेही दगावली आहेत.
झोपडीवर वीज कोसळल्याने भोकरदन तालुक्यातील राहुल विठ्ठल जाधव (१९) मुत्युमुखी पडला तर त्याचे आई-वडिल आणि चुलते जखमी झाले.याच तालुक्यातील भायडी गावच्या शिवारात वीज पडल्याने रामदास आनंदा कड (२८) यांचा मृत्यू झाला. वीजा कोसळल्याने आठ गुरे दगावली तर एका कुक्कुटपालन केन्द्रातील अनेक कोंबडया मृत्युमुखी पडल्या. यापूर्वी याच महिन्यात भोकरदन तालुक्याती सुरंगळी येथे शेतात काम करणाऱ्या बाजीराव दांडगे यांचा वीज पडून मृत्यू झाला होता. तर जालना तालुक्यातील भाटेपुरी येथील विठ्ठल गंगाधर कावळे हा तरुण शेतकरी शेतात काम करताना वीज पडून ठार झाला होता.
अवकाळी पावसामुळे फळपिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी आंब्याच्या कैऱ्या जमीनीवर पडल्या. मोसंबी, डाळींब यासह इतर फळपिकांचेही नुकसान झाले. जालना, बदनापूर, अंबड, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यांतील पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला. येत्या मे पर्यंत जिल्ह्य़ात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला असून ‘यलो अलर्ट’ दिलेला आहे . दरम्यान मे महिन्याच्या पहिल्या आठवडयात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्हयात १८४ गावांतील १ हजार ९२३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल संबंधित प्रशासकीय यंत्रणेने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे .
या अहवालानुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेली गारपीट, वादळ आणि पावसामुळे जिल्ह्य़ातील 2 हजार ६३८ शेतकयांच्या पिकांचे नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक १ हजार 232 हेक्टर क्षेत्रावरील नुकसान बदनापूर तालुक्यात झाले.