जालना – बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील तलावात प्लास्टिकच्या पोत्यात बांधून फेकलेल्या मृतदेहामागचे कोडे अखेर महिनाभरानंतर उलगडले आहे. ओळख पटण्यासह घटनाक्रमही समोर आला आहे. मृत व्यक्तीचे नाव परमेश्वर तायडे असून, पत्नी आणि भावाच्या अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरल्याने त्याचा खून करण्यात आला. पोलिसांनी दीर व भावजयीविरुद्ध गुन्हा नोंद करून दोघांनाही अटक केली आहे. याप्रकरणी परमेश्वरचे वडील रामनाथ तायडे यांनी तक्रार नोंदवली.

सोमठाणा परिसरातील तलावात प्लास्टिकच्या पोत्यात बांधलेला मृतदेह आढळून आला होता. १४ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. पोलिसांनी केलेल्या तपासात परमेश्वरच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केलेल्या खुणा आढळून आल्या. शवविच्छेदन अहवालातूनही खून असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. अखेर परमेश्वरची पत्नी मनीषा आणि त्याचा लहान भाऊ ज्ञानेश्वर यांनीच डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याचे आढळून आले. अनैतिक संबंधांत अडसर होत असल्याने परमेश्वर तायडे याचा खून करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय होता आणि तो तपासातून स्पष्ट झाला. अखेर दीर आणि भावजयीला बदनापूर पोलिसांनी अटक केली.