कर्जत: जामखेड तालुक्यातील एका शासकीय कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृहात रॅगिंगचा प्रकार घडला. या संदर्भात महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांसह इतर अनोळखी विद्यार्थ्यांवर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅगिंग कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी सांगितले. हे कृषी महाविद्यालय अलीकडेच सुरू झालेले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कृषी महाविद्यालयातील प्रथम वर्षात प्रवेश घेतलेला व मूळचा पारनेर तालुक्यातील रहिवासी असलेला विद्यार्थी ७ सप्टेंबरला त्याच्या काही विद्यार्थी मित्रांसमवेत वसतिगृहातील खोलीवर झोपला होता. तेथे काही वरिष्ठ विद्यार्थी गेले व त्यांनी कनिष्ठ विद्यार्थ्यांना रांगेत उभे करून खाली वाकून पाहण्यास सांगितले तसेच आम्ही सांगू तसे वागावे लागेल, असे म्हणत रॅगिंग केली.
या घटनेनंतर पीडित विद्यार्थ्यांनी घडलेला प्रसंग वसतिगृहाच्या अधीक्षकांना सांगितला. अधीक्षकांनी सर्व मुलांना समजावून सांगितले व सर्वांना आपल्या खोल्यांमध्ये पाठवले. त्यानंतर त्याच मध्यरात्री व दुसऱ्या दिवशीही पीडित विद्यार्थी व त्याचे मित्र वसतिगृहातील आपल्या खोलीत झोपले असताना वरिष्ठ विद्यार्थी खोलीच्या दरवाजाची कडी तोडून आतमध्ये गेले.
त्यांनी पीडित विद्यार्थ्याला काठी, लाथाबुक्क्यांनी हातावर, पोटावर, पाठीवर व डोक्यात मारहाण करून जखमी केले. तू अधीक्षकांना दूरध्वनी करून आमची तक्रार का केली, असा जाब विचारत वरिष्ठ विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थ्याला शिवीगाळ केली तसेच तुला महाविद्यालयात शिक्षण घ्यायचे असेल तर आम्ही सांगू तसेच वागावे व राहावे लागेल, अशी धमकी दिली.
यानंतर पीडीत विद्यार्थ्याने पोलीसांच्या ११२ क्रमांकावर दूरध्वनी करून माहिती दिली. जामखेड पोलीसही तातडीने घटनास्थळी आले. पीडित विद्यार्थ्याने घडलेला प्रसंग आपल्या पालकांनाही कळवला. पालकही तातडीने महाविद्यालयावर आले. जखमी विद्यार्थ्याला नगर शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रॅगिंगच्या या घटनेमुळे जामखेड तालुक्यात व कृषी विद्यापीठाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. शासकीय कृषी महाविद्यालयावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असतानाही हा प्रकार घडला. पीडित विद्यार्थ्याने दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांनी विविध कलमांसह महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा १९९९ च्या कलम ४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी करत आहेत. घटनेसंदर्भात संबंधित कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
विद्यापीठाची चौकशी समिती
वसतिगृहात घडलेल्या घटनेसंदर्भात कृषी विद्यापीठाने पाच जणांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीने महाविद्यालय व वसतिगृहाला भेट देऊन चौकशी केली आहे. या संदर्भात जे विद्यार्थी दोषी आढळतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे संबंधित वसतिगृहाच्या अधीक्षकांनी सांगितले.
आरोपी विद्यार्थ्यांना नोटीसा
संबंधित कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील घटनेसंदर्भात रॅगिंग कायद्याअंतर्गत कलमान्वये विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच संबंधित आरोपी विद्यार्थ्यांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक तथा तपासी अधिकारी दशरथ चौधरी यांनी दिली.
