अहिल्यानगर: शहरात खोदलेले रस्ते, बंद पडलेले वाहतूक नियंत्रक दिवे व वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा याचा निषेध करण्यासाठी जनहित परिषद व जागरूक नागरिक मंचने ‘डीएसपी’ चौकातील वाहतूक नियंत्रण दिव्यांना दोरे बांधण्याचे आंदोलन केले. वटपौर्णिमेचे औचित्य साधत महिलांच्या हस्ते हे आंदोलन करण्यात आले.
मंचचे अध्यक्ष सुहास मुळे, माजी उपमहापौर गीतांजली काळे, करुणा कुकडे, मयुरी मुळे, सारिका कुकडे, युगंधरा अंतरकर, गोविंद कुकडे आदी आंदोलनात सहभागी होते.यासंदर्भात माहिती देताना सुहास मुळे यांनी सांगितले की, शहरात खोदून ठेवलेले रस्ते, चौकात उपस्थित नसलेले पोलीस व वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
या पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे सावित्रीने सत्यवानाचे प्राण यामराजाकडून वडाच्या झाडाला संकल्पाचा दोरा बांधून पुन्हा मिळवले. त्याप्रमाणे सध्याच्या शहरातील परिस्थितीत माता-भगिनी आपले पती सुखरूप घरी यावेत यासाठी वाहतूक नियंत्रण दिव्यांना दोरे बांधण्याचे आंदोलन केले. नगर-मनमाड व नगर-छत्रपती संभाजीनगर या रस्त्यावर पथदिवेही नाहीत. कायनेटिक चौकात १५ लाख रुपये खर्चून दोन वर्षांपासून उभे असलेले वाहतूक नियंत्रक दिवे बंद आहेत. या आंदोलनातून जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी व पोलिसांनी सुधारणा करत बंद वाहतूक नियंत्रक दिवे सुरू केले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन काळे दोरे बांधण्याचे आंदोलन केले जाईल, असा इशाराही सुहास मुळे यांनी दिला आहे.