सोलापूर : हिंदी चित्रपटसृष्टीत लाखो चाहत्यांचे प्रेम असलेल्या सलमान खान, शाहरूख खान फार तर अक्षयकुमार सारख्या आघाडीच्या अभिनेत्यांच्या चित्रपटांसाठी थिएटर भरून जातात. अशा चित्रपटांच्या फलकांवर भले मोठे पुष्पहार घालून फटाक्यांची आतषबाजी करणे किंवा प्रत्यक्ष चित्रपटगृहात पैसे उधळणे आणि संपूर्ण चित्रपटाचा खेळ एखाद्या चाहत्याने बुकिंग करणे या बाबी आता नवलाईच्या ठरत नाहीत. परंतु जान्हवी कपूर या नवख्या अभिनेत्रीचा ‘मिस्टर ॲण्ड मिसेस माही’ हा चित्रपट सोलापुरात प्रदर्शित झाला असता एका हौशी चाहत्याने सहा लाख रुपये खर्च करून १८ खेळ बूक केले आहेत. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांनी अभिनय केलेल्या ‘मिस्टर ॲण्ड मिसेस माही’ या चित्रपटाचा ट्रेलर समाज माध्यमांवर पाहायला मिळत असून त्यातील गाण्यांनी हा चित्रपट वलयांकित ठरला आहे. परिणामी, या चित्रपटाच्या माध्यमातून जान्हवी कपूरच्या चाहत्यांमध्ये लाखोंची भर पडत आहे. त्यामुळे ‘मिस्टर ॲण्ड मिसेस माही’ चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती.

हेही वाचा – “आमच्या नादाला लागू नका, आमच्या भूमिका या…”, रवी राणांच्या ‘त्या’ दाव्यावर संजय राऊतांचे प्रत्युत्तर!

हेही वाचा – राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवरून शरद पवार आक्रमक; मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिला इशारा; म्हणाले…

सोलापुरात एका चित्रपटगृहात हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होताच तेथे चाहत्यांच्या उड्या पडू लागल्या आहेत. चित्रपट हाऊस फुल्ल होत असतानाच धर्मराज गुंडे नावाच्या एका हौशी चाहत्याने स्वतः सहा लाख रुपये भरून चित्रपटाचे १८ खेळ बूक केले आहेत. स्वतःबरोबरच मित्र परिवार, नातेवाईक आणि जान्हवी कपूरच्या चाहत्यांना हा चित्रपट मोफत पाहता यावा, हा यामागे उद्देश असल्याचे गुंडे यांनी सांगितले.