मुंबई : पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर परकीय चलन वाचवण्यासाठी काटकसरीच्या उपाययोजना करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य विधिमंडळाने आमदारांचा पुढच्या आठवड्यात असलेला नियोजित जपान दौरा रद्द केला आहे.

२३ मे ते २ जून या दरम्यान जपानच्या ओसाका आणि वाकायामा या दोन राज्याच्या १२ आमदार अभ्यास दौऱ्यावर जाणार होते. विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही सभागृहात च्या आमदारांचा यामध्ये समावेश आहे. त्याची पूर्ण तयारी झाली होती. या अभ्यास दौऱ्यामध्ये संस्थात्मक भेटी, तंत्रज्ञान केंद्रे, बुलेट ट्रेन याच्या पाहणी बरोबर काही पर्यटन स्थळांनाही शिष्टमंडळ भेट देणार होते.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा होता. या दौऱ्याचा पूर्ण खर्च राज्य विधिमंडळ करणार होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर काटकसरीचे उपाय अवलंबण्याचे आवाहन देशवासीयांना नुकतेच केले आहे. सोने खरेदी व परदेश दौरे पुढे ढकला प्रवासासाठी सार्वजनिक परिवहन सेवेचा वापर करा असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.

त्याला प्रतिसाद देत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी कांन्स चित्रपट महोत्सवाचा दौरा रद्द केला आहे. तसेच पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी पॅरिस व लंडनचा आपला नियोजित कौटुंबिक दौरा रद्द केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या जपान अभ्यास दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

वाकायामा हा जपानमधील होन्शू बेटावरचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रांत आहे. वाकायामा शहर या प्रांताची राजधानी असून हे क्षेत्र पर्यटन आणि निसर्ग सौंदर्यासाठी ओळखले जाते. तर ओसाका हे जपानचे मोठे आर्थिक, औद्योगिक आणि व्यापारी केंद्र असून टोकियो नंतरचे जपानचे दुसरे महानगर क्षेत्र आहे.

विधिमंडळाच्या वतीने दरवर्षी आमदारांसाठी परदेशात अभ्यास दौरे काढले जातात. अनेकदा काही सदस्य दौऱ्यात गैरहजर राहतात, त्यांच्या जागी नवे सदस्य सहभागी होतात. मात्र ऐनवेळी पूर्ण दौरा रद्द करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ओसाका आणि वाकायामा या जपानमधील दोन राज्यांच्या गव्हर्नरनी राज्य विधिमंडळ सदस्यांना निमंत्रित केले होते. अभ्यास दौऱ्याची पूर्ण तयारी झालेली आहे.मात्र पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर परकीय चलन आणि इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पंतप्रधानांनी काटकर सर करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे नियोजित जपान अभ्यास दौरा रद्द करण्याबाबत मी कार्यवाही करत आहे. – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा