scorecardresearch

सांगली : …अन् ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी त्या आठ वर्षाच्या मुलाचं केलं जटा निर्मूलन

तथाकथित पुजाऱ्याने त्यांना जटा काढू नये मुलाचा जीव धोक्यात येईल अशी भीती घातली होती. त्या भीती पोटी पालकांनी मुलांच्या जटेकडे दुर्लक्ष केले होते.

9 year old boy
अवघ्या दहा मिनिटात मुलास जटा मुक्त केले

सांगलीमधील महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी एका आठ वर्षीय मुलाच्या जटा निर्मूलन करण्यास यश आले आहे. इस्लामपूर एमआयडीसी परिसरात रोजंदारी कामासाठी आलेल्या कुटुंबात जटाधारी मुलगा असल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले आणि त्याच्या जटा निर्मूलन करण्याचे ठरले.

दिनेश दिलीप पावरा (वय ८ वर्षे, मूळ गाव फतेपूर जि.धुळे) आदिवासी बहुल भागातील मुलगा आपल्या आई-वडीलांसोबत तात्पुरत्या झोपडीत राहत होता. गेली पाच सहा वर्षापासून त्यास जटा होत्या, दैवी प्रकोप समजून त्यांनी जटा काढण्याचे टाळले होते. तथाकथित पुजाऱ्याने त्यांना जटा काढू नये मुलाचा जीव धोक्यात येईल अशी भीती घातली होती. त्या भीती पोटी पालकांनी मुलांच्या जटेकडे दुर्लक्ष केले होते.

महाराष्ट्र ‘अंनिस’चे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे, अंधश्रध्दा निर्मूलन पत्रिकेचे संपादक प्रा. डॉ. नितीन शिंदे, डॉ जितेंद्र लादे, सचिन भिलारे, अमोल पवार यांनी सदर मुलाच्या पालकांना, नातेवाईकांना समजून सांगितले. त्यांना जटा निर्मूलन केलेल्या अनेक व्यक्तीचे फोटो दाखवून प्रबोधन केले. अखेर दिनेशच्या जटा काढल्या. इस्लामपूरमधील सुप्रसिद्ध अभियंते महेश मोरे, विक्रांत मोरे, संजय बनसोडे, नितीन शिंदे, सचिन भिलारे, अमोल पवार यांनी अवघ्या दहा मिनिटात मुलास जटा मुक्त केले.

नंदकुमार पाटील, राजेंद्र मोटे, विलास पावरा, प्रमिला पावरा, संगीता चव्हाण, गोपाळ वसावे, अमरिंबा पाडवी यांचे सहकार्य या कामासाठी मिळाले. इस्लामपूर ‘अंनिस’च्या वतीने आतापर्यंत दीडशेहून अधिक व्यक्तीच्या जटा निर्मूलन केले आहे. समितीने आवाहन केले आहे की जटाधारी व्यक्ती आपल्या परिसरात असतील तर ‘अंनिस’शी संपर्क साधावा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jat nirmulan 8 year old boy get rid of matted hair scsg

ताज्या बातम्या