मुंबई : अनुसूचित जातीच्या विकासासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात दिला जाणारा निधी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागांमधून उपलब्ध होणारे राजकीय प्रतिनिधीत्व यांमध्ये योग्य वाटा मिळवण्यासाठी देशातील १६ व्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती आणि आंबेडकरी अभ्यासक-विचारवंतांनी ‘जात सांगा’ असे अभिनव अभियान सुरु केले आहे.
अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे प्रस्तावित असलेले उपवर्गीकरण आणि विलंबाने होत असलेली जनगणना यांमुळे बौद्ध समाजात प्रतिक्रिया उमटू लागली आहे. १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. बौद्धांमध्ये जाती नाहीत, त्यामुळे जनगणनेत बौद्ध धर्म सांगणार पण पूर्वाश्रीमची जात नमूद करणार नाही, अशी अनेक नवबौद्धांची ताठर भूमिका आहे. यामुळे बौद्ध धर्मियांचा टक्का वाढला तरी अनुसूचित जातीची लोकसंख्या मात्र घटली.
परिणामी, लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणारा निधी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय प्रतिनिधित्व कमी झाले. सहा महिन्यांपूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या विषयाला तोंड फुटले होते.
नुकत्याच सुरु झालेल्या जनगणनेमध्ये ही चूक दुरुस्त करण्याचा निर्णय नवबौद्ध समाजाने घेतला आहे. यामध्ये आंबेडकर कुटुंबिय विश्वस्त असलेल्या भारतीय बौद्ध महासभा आणि बौद्धजन पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. जागोजागी बैठका घेतल्या जात आहेत. अनेक संघटना व समाजातील अभ्यासक- विचारवंतांनी पत्रके काढली आहेत.
जनगणनेमध्ये प्रथम बौद्ध धर्म नोंद करा. बौद्ध धर्म नोंद केल्याने अनुसूचित जातीचे आरक्षण जाणार नाही. हिंदू व शिखांप्रमाणे बौद्धांमधील अनुसूचित जातींना आरक्षणाचे लाभ मिळण्याबाबत १९९० मध्ये कायद्यामध्ये दुरुस्ती केली आहे. बौद्ध धर्म नोंदवल्यानंतर संविधानिक अधिकाराचा लाभ मिळण्यासाठी पूर्वाश्रमीची जातसुद्धा सांगा, त्याचबरोबर बौद्ध साहित्य ज्या भाषेमध्ये आहे ती पाली अधिकची भाषा म्हणून नोंद करा, असे आवाहन केले जात आहे.
राज्यात २०११ च्या जनगणनेप्रमाणे १ कोटी ३२ लाख अनुसूचित जातीची लोकसंख्या असून त्यामध्ये ६५ लाख ३१ हजार बौद्ध आहेत. हे अभियान राष्ट्रीय पातळीवर राबवण्यात येत आहे. १९५६ चे धर्मांतर आणि पूर्वाश्रीमीची जात नमूद न करणे यामुळे १९६१ पासूनच्या जनगणनांमधील नवबौद्धांच्या लोकसंख्येसंदर्भात संभ्रम निर्माण झालेला आहे. एकीकडे राजकीय प्रतिनिधीत्व आणि निधीचा लाभ घेण्याबरोबरच राष्ट्रीय पातळीवर बौद्धांची नोंदणी १० कोटीपर्यंत नेण्याचे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
या जातीना आवाहन
उत्तरेत चमार, सैनी, मौर्य, खुशवा, गुजरातमध्ये वाल्मिकी व वणकर, कर्नाटकमध्ये वल्लुवन आणि महाराष्ट्रात चर्मकार व मातंग व इतरांनी जनगणनेमध्ये बौद्ध धर्म नोंदवावा, असे आम्ही आवाहन करत आहोत. – भीमराव आंबेडकर, कार्याध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा.
हिंदु अनुसूचित जातीनी बौद्ध नोंदवा
बौद्ध धर्माचरण करणारे पण कागदपत्रावर हिंदू व अनुसूचित जातीचा उल्लेख केलेले लाखो नागरिक आहेत. त्यांनी या जनगणनेमध्ये बौद्ध धर्माबरोबरच पूर्वाश्रीमीची जात नोंदवावी, असे आमचे आवाहन आहे. – राजकुमार बडोले, माजी सामाजिक न्याय मंत्री.
