|| दिगंबर शिंद

सांगली : पाचवीला पुजलेल्या दुष्काळाने पिचलेल्या जतकरांना म्हैसाळ योजनेच्या विस्तारीकरणाचे स्वप्न दाखविण्याचा जुनाच डाव पुन्हा एकदा राजकीय मंचावरून खेळला जात आहे. अजून या योजनेच्या प्रशासकीय मान्यतेचा पत्ताच नाही, मात्र, चांदोली धरणातून कर्नाटकला देण्यात आलेले सहा टीएमसी पाणी जत आणि अक्कलकोटसाठी परत मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी पाणी आरक्षित करण्यात आल्याचे सांगण्यामागे वारसदाराची राजकीय सोय लावण्याचा हेतू की जिल्हा परिषदेबरोबरच जिल्हा बँक निवडणुकीसाठी राजकीय डावपेच आहेत हे येणारा काळच सांगणार आहे.

जत तालुक्यातील म्हैसाळ सिंचन योजनेपासून वंचित राहिलेल्या पूर्वेकडील ६५ गावांसाठी चांदोली धरणातील सहा टीएमसी पाणी आरक्षित करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीबरोबरच भाजपच्या मंडळींनीही पालकमंत्री पाटील यांचे अभिनंदन केले. यासाठी तालुक्यात विविध ठिकाणी सत्काराचे आयोजनही करण्यात आले. या सत्काराचे नियोजन करण्यात भाजपच्या काही मंडळींचा पुढाकार होता. तरीही सरकारमधील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसने हातचे राखतच आनंद साजरा केला असला तरी याला वेगळीच किनार आहे.

या वंचित गावातील काही गावांना कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून काहीही खर्च न करता विजेचा वापर न करता नैसर्गिक उताराने पाणी मिळेल अशी व्यवस्था असताना त्याचा आग्रह का धरला जात नाही असा साधा सरळ  प्रश्न आहे. कारण विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी मिरज तालुक्यातील आरग येथून पाणी उपसा करून न्यावे लागणार आहे. तीन टप्प्यात उपसा केला तरच या भागाला पाणी मिळणार आहे. या तीन टप्प्यात विजेची मोठी गरज असणार आहे. या विस्तारित योजनेसाठी सध्याच्या दरकरारानुसार ८५० कोटींच्या निधीची गरज आहे. एवढा निधी एकाच वेळी उपलब्ध होईल का? हाही प्रश्न आहेच.

सध्या केवळ चांदोली धरणातील ६ टीएमसीचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे. ३४.४० टीएमसी क्षमतेच्या चांदोली धरणातील १८.६ टीएमसी पाणी सध्याच्या योजनेसाठी आरक्षित आहे. हे पाणी जतनंतर सांगोला, मंगळवेढा तालुक्यात पोहचले. मात्र जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६५ गावे वंचितच राहिली आहेत. या गावांनाही पाणी मिळायलाच हवे याबाबत कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. कारण तो त्यांचा हक्क आहे. मात्र याच हक्काचे ज्यावेळी राजकारण करण्याचा प्रयत्न होतो त्यावेळी दुष्काळाग्रस्तांची चेष्टा करण्याचा डाव तर नाहीना अशी शंका कोणाच्या मनात आली तर ती चुकीची कशी म्हणता येईल?

पाणी आरक्षित केले की लगेच जादूची कांडी फिरल्याप्रमाणे जत पूर्वच्या भुंड्या माळावर पाणी खेळू लागले असे होत नाही. अजून या योजनेला सरकारी पातळीवरून मंजुरी मिळालेली नाही. सरकारच्या मंजुरीनंतर आराखडा तयार करावा लागणार आहे. या आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर खर्चाचे नियोजन जलसंपदा विभागाला करावे लागणार आहे. यासाठी किती कालावधी आणि किती निवडणुका पार पडतील याची वस्तुस्थितीदर्शक माहिती देण्याचे मात्र टाळले जात आहे.

केवळ पाणी आणून हारतुरे स्वीकारण्याऐवजी प्रत्यक्षात पाणी आणून त्यांचे डामडौलाने स्वागत केले तर जतची जनता निश्चितच पायघड्या घालायलाही मागे पडणार नाही.

जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, मिरज व तासगाव तालुक्याचा पूर्व भाग ही दुष्काळग्रस्त गावे, गेल्या कैक पिढ्यांनी तोंड देत या दुष्काळालाच आपला जगण्यातील साथीदार केला आहे.

अशा स्थितीतही हा भाग जगण्याचा संघर्ष करीत आहे. या वंचित गावातील सुमारे १९ हजार हेक्टर क्षेत्राला तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी मिळू शकते. तेही या योजनेतून अतिरिक्त वाया जात असलेल्या पाण्याचा वापर करून. त्यासाठी शासनकर्त्यांनी आग्रह धरण्याची गरज आहे. कर्नाटक सरकार या योजनेतून पाणी देण्यासही राजी आहे. चांदोली धरणातील पाणी उन्हाळी हंगामात दिले तर त्या पाण्याची परतफेड जत आणि सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटसाठी करण्याची तयारी कर्नाटकची आहे.

तुबची-बबलेश्वर योजनेतून पावसाळी हंगामात वाया जाणारे पाणी जरी जतसाठी मिळाले तर या भागातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदतच होणार आहे. यासाठी राज्य शासनाला पैसेही खर्च करावे लागणार नाहीत.

गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राने कर्नाटकला सहा टीएमसी पाणी उन्हाळी हंगामात दिले आहे. किमान त्याची परतफेड करण्यासाठी कर्नाटककडे आग्रह धरला तरी या तालुक्यातील १८ ते १९ हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होऊ शकतो.

जतच्या वंचित गावासाठी पाणी आरक्षित करण्याचा निर्णय चांगलाच आहे. मात्र ही योजना पूर्णत्वास जाण्यास काही कालावधी  जाणार आहे. या कालावधीत पर्यायी व्यवस्था म्हणून तुबची-बबलेश्वरचे पाणी किमान पावसाळी हंगामात मिळावे यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.  – विक्रर्मंसह सावंत, आमदार

जत तालुक्यातील मागच्या पिढीने पाण्याचे स्वप्न पाहिले आहे. या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी कोणतीही योजना आखली जात असेल तर त्याचे निश्चितच स्वागत करायला हवे. मात्र दुष्काळी जनता आता स्वप्नात मग्न होण्यास राजी नाही. पाण्यासाठी आता संघर्ष करायला लागला तरी तो करण्याची आमची तयारी आहे. – तमणगौडा पाटील, गट नेते, भाजप, जिल्हा परिषद