नगर जिल्ह्यातील जवखेडा येथे झालेल्या हत्येच्या निषेधार्थ लातुरमध्ये शनिवारी काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागल्याची घटना घडली. यामध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहने आणि सरकारी इमारतींवर जोरदार दगडफेक केली. या मोर्चात महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आधी शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या मोर्चाला हिंसक वळण लागले. आंदोलनकर्त्यांनी सरकारी इमारती आणि वाहनांवरही हल्ला केला. त्यामुळे लातूरच्या रस्त्यांवर जिकडे तिकडे दगड आणि फुटलेली वाहने, दुकाने पाहायला मिळत आहेत. अहमदनगर येथील जवखेडा येथे जमिनीच्या वादातून दलित कुटुंबातील तिघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन विहीरीत टाकण्यात आले होते. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या हत्याकांडातील मारेकऱ्याचा अद्यापही शोध लागत नसल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी आंबेडकरी जनतेच्या वतीने मोर्चा, निदर्शने आणि रास्ता रोको करून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.