Jay Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला निघाले होते. सकाळी साधारण पावणेनऊच्या सुमारास त्यांचं विमान बारामतीत लँड करत असताना अपघात झाला. क्रॅश लँडिंगमुळे अजित पवारांसह विमानातले पाचही जण या अपघातात ठार झाले. महाराष्ट्राला शोकसागरात टाकणारी ही घटना घडली. २९ जानेवारीला बारामती या ठिकाणी असलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर साश्रू नयनांनी अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अजित पवारांच्या मृत्यूबाबत तो अपघात होता की घातपात अशी चर्चा सुरु झाली आहे. रोहित पवार यांनी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे जय अजित पवार यांनी इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवत ब्लॅक बॉक्स नष्ट होऊ शकत नाहीत. अपघाताचं सत्य समोर आलं पाहिजे असं म्हटलं आहे.

जय पवार यांनी काय म्हटलं आहे?

विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीत; महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे संपूर्ण पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे. व्हीएसआरला तात्काळ उड्डाणे चालवण्यास बंदी घालून,त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहारांबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली पाहिजे. Miss You Dad असं म्हणत अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी स्टेटस पोस्ट केलं आहे.

Jay Ajit Pawar Instagram Status
जय अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलं आहे? (फोटो-जय पवार, इन्स्टाग्राम पेज)

विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळाला? रोहित पवारांचा सवाल

ब्लॅक बॉक्स ११०० सेल्सिअस डिग्रीवर आगीत पडला तर तो जळतो. व्हॉइस रेकॉर्डिंग असतं आणि एफडीआर असतं. किती तरी हजार हत्ती प्रेशर केले तरी ब्लॅक बॉक्सला काही होत नाही. तिथे बरेसचे कागद जळाले नव्हते. कारण, स्फोटाचा भपका काही सेकंदापुरता असतो, तो नंतर विझून जातो. तो भपका अंदाजे १००० सेल्सिअस डिग्रीच्या आसपास असू शकतो. विमानाची बॉडी अॅल्युमिनिअम अलॉय असते. ६३५ डिग्री सेल्सिअसवर हे मटेरिअल वितळू शकतं. बाकीचा भाग १७६० डिग्रीला वितळतं. विमानाची बॉडीचा भाग आत असतो, त्याच्या आत ब्लॅक बॉक्स असतो. म्हणजेच, आम्ही आज पत्रकार परिषद घेणार होतो, त्यामुळे काल नागरी उड्डाण मंत्रालयाने ब्लॅक बॉक्सविषयी घाईगडबडीत माहिती दिली, असाही दावा रोहित पवारांनी केला. यानंतर आता अजित पवारांचे पुत्र जय अजित पवार यांनीही स्टेटस पोस्ट करत पारदर्शक चौकशी झाली पाहिजे आणि सत्य समोर आलं पाहिजे अशी मागणी केली आहे.