गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या सेनेकडून ऑपरेशन टायगर राबवण्यात आलं. या माध्यमातून ठाकरे सेनेच्या सहा खासदारांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला. त्यामुळे यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्यामुळे राजकारण चांगलंच तापलेलं आहे. या घडामोडी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे पुन्हा एकदा अर्थखातं सोपवलं जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

या चर्चांचं कारण म्हणजे अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीला मिळण्याबाबत जय पवार यांनी मोठं भाष्य केलं आहे. जय पवार यांनी बारामतीमधील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला पुन्हा अर्थखातं मिळण्याबाबत मोठा दावा केला आहे. एवढंच नाही तर याबाबत चर्चा झाली असून राष्ट्रवादीला लवकरच अर्थखातं मिळणार असल्याचंही जय पवार यांनी म्हटलं आहे.

जय पवार काय म्हणाले?

“सगळे बोलत आहेत की आपलं अर्थखातं अजून आपल्या पक्षाकडे आलं नाही. त्यामुळे काही ठिकाणी आपली विकास कामं थांबली आहेत. मात्र, असं नाहीये. अजितदादा आपल्याला अचानक सोडून गेले आणि त्यानंतर लगेचच अर्थसंकल्प होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखातं त्यांच्याकडे घेण्याचा निर्णय घेतला. पण आता काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि आमची सर्वांची चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सांगितलं आहे की लवकरात लवकर अर्थखातं आपल्याला दिलं जाईल. तसंच अजित पवार यांचं विकास कामांबाबतचं जे स्वप्न होतं, ते आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू”, असं जय पवार यांनी बारामतीमधील एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.

अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीला देण्याबाबत फडणवीसांनी काय म्हटलं होतं?

गेल्या काही दिवसांपासून अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीला मिळण्यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादीला अर्थखातं पुन्हा कधी मिळणार? याबाबत राष्ट्रवादीचे नेतेही प्रश्न उपस्थित करत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीला अर्थखातं देण्यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अगदी मोजक्या शब्दांत उत्तर दिलं होतं.

सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याच्या चर्चा असल्याचं पत्रकारांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, “मला तरी अद्याप अर्थखातं मागितलं नाही. मात्र, मला मागितलं की मी सांगेन. माझ्यापर्यंत अशी कोणतीही नाराजी आलेली नाही. जर माझ्यापर्यंत अशी कोणती नाराजी आली तर मी त्याबाबत बोलेन.”

“आज तरी अर्थखातं माझ्याकडेच”, फडणवीसांनी काय म्हटलं होतं?

दरम्यान, १२ जून रोजी झालेल्या एका पत्रकार परिषदेच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की, येत्या काळात अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला देण्याबाबतचे काही संकेत आहेत का? यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर देत म्हटलं होतं की, “आज तरी अर्थखातं माझ्याकडेच आहे.”