महाराष्ट्र काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उद्देशून ‘गुंगी गुडिया’ असा शब्द वापरला होता. ही टीका चुकीची आहे आणि हा शब्द योग्य नाही असं म्हणत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी या टीकेचा निषेध नोंदवला. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांनीही काँग्रेसवर टीका केली. या सगळ्यानंतर जय अजित पवार यांनी सुनेत्रा पवारांसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. आपल्या पोस्टमधून त्यांनी काँग्रेसला खडे बोलही सुनावले आहेत.
काय आहे जय पवार यांची पोस्ट?
माननीय सुनेत्रा पवार यांच्याबाबत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या नेत्यांनी वापरलेली भाषा ही केवळ एका व्यक्तीवर केलेली टीका नसून, निष्ठा, कठोर परिश्रम, जनसेवा आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर समाजात मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या सन्मानावर झालेला थेट आणि निषेधार्ह आघात आहे. माननीय सुनेत्रा पावर या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. राजकीय मतभेद असू शकतात; परंतू महिलांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि व्यक्तिमत्वाला कमी लेखणारी अथवा त्यांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही सुसंस्कृत लोकशाहीत कधीही स्वीकारली जाऊ शकत नाही. राजकारण हे विचारांचे, धोरणांचे, कामगिरीचे आणि जनतेच्या विश्वासाचे असते. महिलांचा अवमान करणाऱ्या शब्दांचे नव्हे. मतभेद जरुर असावेत; पण ते तथ्य, सभ्यता, संयम आणि लोकशाही मूल्यांच्या चौकटीतच व्यक्त झाले पाहिजेत. असं जय पवार यांनी म्हटलंय.
मी आज केवळ माझ्या आईच्या पाठिशी उभा नाही तर…
आज मी केवळ माझ्या आईच्या पाठिशी उभा नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या भारतातील प्रत्येक महिलेच्या सन्मानाच्या रक्षणासाठी ठामपणे उभा आहे. तिची राजकीय विचारधारा कोणतीही असो, तिचा सन्मान हा अबाधिक आणि निर्विवाद राहिला पाहिजे. राजकारणात विजय-पराजय होत राहतात. सत्ता बदलत राहते. पण महिलांचा सन्मान हा कोणत्याही पक्षापेक्षा, कोणत्याही नेत्यापेक्षा आणि कोणत्याही राजकीय संघर्षापेक्षा श्रेष्ठ आहे.त्या सन्मानाला धक्का पोहचवणारं विधान फक्त निषेधार्हच नाही तर लोकशाहीच्या संस्कृतीला काळीमा फासणारं आहे. असंही जय पवार यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांचीही काँग्रेसवर टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांना काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला होता. यावर बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत. मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही. त्यांना कुणी विचारत नाही. त्यामुळे बातमीत येण्यासाठी अशा पद्धतीचं विधान केलं जात आहे. बदनाम हुये तो हुये, नाम तो हुआ अशा पद्धतीने यांची कार्यवाही सुरू आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पहायला मिळत आहेत.
