Jay Pawar : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. याबाबत नुकतंच युगेंद्र पवार यांनी भाष्य केलं होतं. त्यानंतर आज जय पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

अवकाळी पावसामुळे बारामतीत झालेल्या शेतीच्या नुकसानाची जय पवार यांनी पाहणी केली. या दौऱ्यावेळी जय पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी जय पवार यांना दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण व्हावं का? काय वाटतं? असा प्रश्न विचारला. यावर बोलताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत जय पवार यांनी पहिल्यांदाच मोठं भाष्य केलं. ‘मला वाटतं की आम्ही कुटुंब म्हणून सर्व एकत्र राहावं’, असं जय पवार यांनी म्हटलं आहे.

जय पवार काय म्हणाले?

“दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणासंदर्भात माझी वैयक्तिक भूमिका नाही. मी छोटा आहे. त्याबाबत सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि बाकीचे जेष्ठ नेते असतील ते ठरवतील. मला वाटतं की आम्ही कुटुंब म्हणून सर्व एकत्र राहावं. कारण जेव्हा अजितदादा आपल्याला सोडून गेले तेव्हा पूर्ण पवार कुटुंब एकत्र होतं आणि आजही आम्ही एकत्र आहोत, आम्ही आजही एकमेकांशी बोलतो. पण राजकारणाबाबत जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही. त्याबाबत पक्षातील वरिष्ठ नेते बोलतील”, असं जय पवार यांनी म्हटलं आहे.

बारामती पोटनिवडणुकीबाबत जय पवार काय म्हणाले?

बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याठिकाणाहून निवडणूक लढवत असून निवडणूक बिनविरोध करण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. यासाठी सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी दुरध्वनीवर चर्चा केली असल्याची माहिती मिळत आहे. तर काँग्रेस याठिकाणी उमेदवारांची चाचपणी करत आहे. या पार्श्वभूमीवर आता जय पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

जय पवार म्हणाले, “ज्येष्ठ नेते शरद पवारही ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बारामतीमधील सर्व जनतेलाही ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं वाटत आहे. ही निवडणूक होणंच दुःखाची गोष्ट आहे. काँग्रेस उमेदवार देणार असल्याची माहिती मिळत आहे. विरोधकांना ही निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी लढावी”, असंही ते म्हणाले.

“अजित पवार हयात असताना त्यांनी लोकशाहीला प्रथम ठेवलं होतं. त्यांनी कधीही कुणाला निवडणूक लढण्यापासून रोखलं नाही. आम्हीही त्यांचेच विचार घेऊन पुढे जात आहोत. बारामतीमधील लोक अजित पवारांच्या निधनानंतर खूप भावनिक आहेत. त्यामुळे विरोधकांना ही निवडणूक लढवायची असल्यास त्यांनी लढवावी”, असंही जय पवार म्हणाले.