Jay Pawar On Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यातच अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत एक पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, काही कारणास्तव जय पवार यांची पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली.
दरम्यान, जय पवार यांची पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना काही सवाल उपस्थित केले होते. ‘जय पवार यांना पत्रकार परिषद घ्यायची होती. मात्र, पत्रकार परिषद घेऊ नये असं कोणीतरी त्यांना सांगितल्याचं मला समजतंय’, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.
या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी जय पवार यांना प्रश्न विचारला की तुम्ही तुमची पत्रकार परिषद पुढे का ढकलली? यावर बोलताना जय पवार यांनी पत्रकार परिषद पुढे ढकलण्यामागचं कारण सांगितलं. तसेच ‘माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. मी पुढील आठवड्यात पत्रकार परिषद घेणार आहे’, असा खुलासा जय पवार यांनी केला आहे.
जय पवार काय म्हणाले?
अजित पवारांच्या विमान अपघाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार देशातील वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. दुसरीकडे विधीमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. मात्र, या अधिवेशनात अजित पवारांच्या विमान अपघातावरील चर्चा पुढे ढकलली जातेय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना जय पवार यांनी म्हटलं की, “मी आता याबाबत काही बोलणार नाही. पण अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत नेमकं काय झालं? हे सर्वांना समजलं पाहिजे. तपास यंत्रणांचा जो नवीन चौकशी अहवाल येईल, त्यातून काय माहिती समोर येते? ते पाहू”, असं जय पवार यांनी म्हटलं आहे.
विमानाच्या पायलटची चुकी असल्याचं व्ही के सिंगने सीआयडीला जबाबात सांगितल्याचा प्रश्न पत्रकारांनी जय पवार यांना विचारला. यावर बोलताना जय पवार यांनी म्हटलं की, “जोपर्यंत तपास यंत्रणा आपल्याला कायदेशीर सर्व माहिती देत नाही, तोपर्यंत याबाबत मी काहीच बोलू शकत नाही. कारण विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये काय झालं?, फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये काय झालं? ही माहिती समोर आली पाहिजे. तसेच आणखी काय-काय गोष्टी आहेत त्या समोर येतील. जेव्हा हे सगळं आपल्याला कळेल तेव्हा यावर आपण सविस्तर बोलू”, असं जय पवार यांनी म्हटलं आहे.
पत्रकार परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय का?
“आता मी पुन्हा एकदा सांगतो की पुढच्या आठवड्यात माझी पत्रकार परिषद होणार आहे. त्या पत्रकार परिषदेत मी सर्वच विषयांवर बोलणार आहे”, असंही जय पवार यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, तुमची पत्रकार परिषद सोमवारी होणार होती, पण ती पुढे ढकलली. तुमच्यावर काही दबाव आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर जय पवार म्हणाले की, “माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. पण मला स्वत:ला काही माहिती पाहिजे. कारण सर्वांच्या समोर येऊन नुसतं बोलून काय फायदा? आपल्याला खरी माहिती पाहिजे, तथ्य सर्वांसमोर यायला पाहिजे. त्यामुळे आम्ही सर्वांनी विचारपूर्वक पत्रकार परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आमच्यावर दबाव कोणाचाच नाही. आज अजित पवार असते तर त्यांनी देखील एखाद्या विषयाची संपूर्ण माहिती घेऊनच पत्रकार परिषद घेतली असती, तसं माझे देखील तेच विचार आहेत”, असं जय पवार यांनी म्हटलं आहे.
