बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयानंतर बारामतीचे राजकारण आता नव्या वळणावर येऊन ठेपले आहे. अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी बारामतीत आजपासून आपला ‘जनता दरबार’ सुरू केला असून, यादरम्यान त्यांनी केलेल्या एका विधानाने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. “२०२९ मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात ही आमची इच्छा आहे”, असे विधान जय पवार यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर महायुतीमधील मित्रपक्षांतील नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अजित पवारांच्या ‘स्टाईल’मध्ये जय पवारांचा जनता दरबार
बारामतीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी जय पवार यांनी दर गुरुवारी जनता दरबार घेण्याचे जाहीर केले होते. आज बारामती येथे या उपक्रमाची सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे, अजित पवारांप्रमाणेच जय पवारांनी अधिकाऱ्यांना जागेवरच फोन लावून प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला.
जय पवारांचे लक्षवेधी विधान
यादरम्यान माध्यमांशी बोलताना जय पवार म्हणाले, “दादांनी एकदा मुख्यमंत्री व्हावे, अशी सर्वच बारामतीकरांची इच्छा होती. आता वहिनी पण तसे कष्ट घेत आहेत. मला वाटतं वहिनींच (सुनेत्रा पवार) २०२९ ला उभ्या राहतील अन् आमच्या सर्वांची आशा आहे वहिनींनाच मुख्यमंत्री म्हणून घ्यायला पाहिजे.”
मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ लागते
“पुत्राने आपल्या आईबद्दल अशी इच्छा व्यक्त करणे यात काहीही गैर नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता राज्याच्या सर्वोच्च पदावर असावा असे वाटते. मात्र, मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ लागते. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे तेवढा आकडा असेल, तेव्हा जय पवारांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.” अशी प्रतिक्रिया भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी दिली.
शिवसेनेकडून सावध प्रतिक्रिया
“जय पवार आता राजकारणात सक्रिय होत आहेत. त्यांनी आपल्या आईबद्दल व्यक्त केलेले मत हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. मात्र, २०२९ ची राजकीय परिस्थिती काय असेल, हे आजच सांगता येणार नाही. आम्ही सध्या तिन्ही पक्ष एकत्रित आहोत. भविष्यात काय घडामोडी घडतात, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.” अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते भरत गोगावले यांनी दिली.
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या हुलकावणीची चर्चा नेहमीच होत असते, मात्र आता जय पवारांनी थेट आईचे (सुनेत्रा पवार) नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेतल्याने राष्ट्रवादीच्या गोटात नव्या ऊर्जेचे संकेत मिळत आहेत. आगामी काळात बारामती आणि राज्याच्या राजकारणात ‘पवार विरुद्ध पवार’ असा संघर्ष सुरू असताना जय पवारांची ही नवी खेळी महायुतीत कोणते वळण घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
