Sunetra Pawar on NCP Merger: सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेस आला. आज सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल भाष्य केल्यानंतर दिवसभरात अजित पवार गटाच्या नेत्यांना या प्रश्नाला सामोरे जावे लागले. माध्यमांनी याबाबत विचारले असता अजित पवार गटाच्या नेत्यांनी सावध पवित्रा घेतला. मात्र आता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच, याचा निर्णय त्यांनीच घ्यावा, अशी अपेक्षा काही नेते व्यक्त करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले की, चार महिन्यांपासून त्यांच्यात आणि अजित पवारांमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू होती. दहा ते बारा वेळा त्यांच्यात बैठकाही झाल्या होत्या. तसेच १७ जानेवारीच्या एका बैठकीचा व्हिडीओही आज समोर आला.

टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलत असताना जयंत पाटील म्हणाले, “निवडणूक आयोगाच्या व्यस्त कार्यक्रमामुळे पक्षाच्या विलीनीकरणाला उशीर झाला. नगरपालिकेनंतर, महानगरपालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या लागोपाठ निवडणुका लागत गेल्या. यात कुठेही अवधी मिळाला नाही. त्यामुळे सर्व निवडणुका झाल्यानंतर आपण विलीनीकरण करू, असे अजित पवार यांनी सांगितले होते.”

१२ फेब्रुवारी रोजी होणार होती घोषणा

जयंत पाटील पुढे म्हणाले, “७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेचे निकाल लागत आहेत. त्यामुळे ८ फेब्रुवारी रोजी लगेच घोषणा करून टाकू, असे अजित पवारांचे मत होते. पण मी ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी उपलब्ध नसल्यामुळे त्यानंतरची तारीख निश्चित करण्याची विनंती मी केली होती. अजित पवार यांनी नंतर १२ फेब्रुवारीचा दिवस ठरवला होता. दुर्दैवाने त्यापूर्वीच अजित पवार यांचे अपघाती निधन झाले.”

अजित पवार यांनी पक्षात कुणाकुणाशी विलीनीकरणाची चर्चा केली आहे, त्यांचीही नावे अजित पवार यांनी मला सांगितली होती. तसेच आमदारांशीही चर्चा केली असल्याचे अजित पवार म्हणाले होते. आमदारांची याला सहमती असल्याचे अजित पवार म्हणाले असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला.

सुनेत्रा पवारांनी आता पुढाकार घ्यावा

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची पुन्हा चर्चा सुरू होईल का? असा प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले की, सुनेत्रा पवार यांनी जर पुढाकार घेतला तर नक्कीच ही चर्चा पुढे जाईल, असा मला विश्वास आहे.

तर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ म्हणाले की, विलीनीकरण किंवा इतर प्रश्नाकडे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय करायचे हे ठरवतील. तर अजित पवार गटाचे दुसरे नेते अनिल पाटील म्हणाले की, आगामी काळात सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल.