राज्य सरकार शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील श्लोकाचा समावेश करण्याबाबत विचार करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्याविरोधात आवाज उठवला आहे. दरम्यान, आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळे परिसरात मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं. यावेळी त्यांच्याकडून चुकून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाली. त्यानंतर त्यांच्यावर भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांनी टीका केली. तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्याविरोधात आंदोलनंही केली. एका बाजूला भाजपा नेते आव्हाडांवर टीका करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ हे जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्याचबरोबर भुजबळांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील श्लोकांचा समावेश करू पाहणाऱ्या शिक्षण विभागावर आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांवर टीका देखील केली. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन्ही गटांमध्ये जिव्हाळा असल्याचं पाहायला मिळालं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एका विचारधारेवर काम करत असल्यामुळे मनुस्मृतीला विरोध करण्यसाठी दोन्ही गटातील नेत्यांनी सारख्याच प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे हे नेते नेमक्या कोणत्या गटात आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रामुख्याने राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा अजित पवार गटातील प्रमुख नेते छगन भुजबळ नेमके कोणत्या गटात आहेत असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना प्रसारमाध्यांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला की, छगन भुजबळ महायुतीबरोबर आहेत की महाविकास आघाडीबरोबर, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. तुम्ही याबद्दल काय सांगाल? यावर जयंत पाटील म्हणाले, “तुम्ही मला उद्या संध्याकाळी (लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर) भेटा, तेव्हा मी यावर उत्तर देईन.” यावर पाटील यांना विचारण्यात आलं की, “हे उत्तर केवळ भुजबळांबद्दल आहे की इतरांबाबतही आहे?” त्यावर पाटील म्हणाले, “केवळ भुजबळांच्याच बाबतीत नाही तर इतरांबाबतचाही संभ्रम दूर होईल. भुजबळांचा विषय थोडा वेगळा आहे. ते नेमक्या कुठल्या बाजूला आहेत ते मी उद्या संध्याकाळी सांगतो. त्याविषयी आत्ता बोलण्यात, अंदाज वर्तवण्यात अर्थ नाही.”

हे ही वाचा >> “आदळआपट करून काय साध्य करणार?” पंकजा मुंडेंचा बजरंग सोनवणेंना सवाल; म्हणाल्या, “उद्या काहीही होऊ शकतं”

भुजबळ आव्हाडांबाबत काय म्हणाले होते?

आव्हाडांकडून अनावधानाने झालेल्या कृतीवर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले होते, “आव्हाड हे खूप चांगल्या भावनेने चवदार तळ्यावर गेले होते. तिथे त्यांच्या हातून चुकून काहीतरी झालं. तो कागद फाडताना त्यांनी त्यावर कोणाचा फोटो आहे ते पाहिलं नव्हतं. त्या चुकीनंतर त्यांनी तिथूनच जाहीर माफीदेखील मागितली आहे. त्यामुळे आव्हाडांवर टीका करत बसण्यापेक्षा सर्वांनी त्यांची भावना लक्षात घेतली पाहिजे. ते विरोधी पक्षातील नेते असले तरी त्यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही. मुळ मुद्द्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. आमचं म्हणणं इतकंच आहे की, आपल्या शालेय शिक्षणात ममुस्मृतीचा चंचूप्रवेश नको.”