Jayant Patil : राज्यातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत असली, तरी काही नेत्यांकडून तिसऱ्या आघाडीचे प्रयत्नही सुरु आहेत. त्यासंदर्भात आज पुण्यात बैठकही पार पडत आहे. या बैठकीला संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू तसंच इतर पक्षांचे नेते हजर आहेत. दरम्यान, राजकीय वर्तुळात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बच्चू कडू यांना महाविकास आघाडीत येण्याचे आवाहन केलं आहे.
जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांना पुण्यातील तिसऱ्या आघाडीच्या बैठकीबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीबरोबर यावं, आम्ही त्यांचे स्वागत करू, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
हेही वाचा – Bachchu Kadu : “अजित पवार गटाचे अर्ध्याहून अधिक आमदार…”; प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचा मोठा दावा!
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
“बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावं, अशी आमची इच्छा आहे. आम्ही भारतीय जनता पक्ष, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याविरोधात महाराष्ट्रात एका आघाडी तयार केली आहे. पण आमच्य मतांमध्ये विभागणी करण्यासाठी महाराष्ट्रात काही लोक उभे राहत आहेत, त्यांना भाजपाचा पाठिंबा आहे. त्यामुळे अशा कोणत्याही प्रकाराला बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी बळी पडणार नाही, असा मला विश्वास आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.
“भाजपाकडून आमच्या मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न”
“बच्चू कडू आणि त्यांचे सर्व सहकारी हे आमच्याबरोबर येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होणार नाही, याची काळजी बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी घेतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. सत्ताधारी पक्षातून काही लोक आमच्या मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याची माहिती आमच्याकडे आलेली आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
हेही वाचा – धक्कादायक! बच्चू कडू यांच्या मोर्चासाठी भंडाऱ्यातील शेकडो महिलांना फसवणूक करून नेले
एक देश एक निवडणुकीबाबत म्हणाले…
पुढे बोलताना त्यांनी एक देश एक निवडणुकीच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. “एक देश एक निवडणूक लागू करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातो आहे. मात्र, ते म्हणावं, तितकं सोपं नाही. नुकताच झालेली लोकसभा निवडणूक बघितली, तर सरकरला सात टप्पात निवडणूक घ्यावी लागली. याचा अर्थ सरकार एका वेळी निवडणूक घेऊ शकत नाही, हे सिद्ध झालं आहे”, असे ते म्हणाले.