Jayant Patil on NCP Merger: अजित पवारांचे अकाली निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा प्रश्न चर्चेत आहे. दोन्ही गटाकडून त्यासंबंधीचे दावे करण्यात येत आहे. दरम्यान आज अजित पवार यांचा शरद पवारांसह काही नेत्यांशी झालेल्या बैठकीचा एक व्हिडीओ समोर आला. या बैठकीत ते विलीनीकरणाच्या विषयावर बोलत असल्याचा दावा करण्यात येत आहे. अजित पवार गटाकडून मात्र हा दावा खोडून काढण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन विलीनीकरणासाठी चार महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते, असे म्हटले. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात अनेक बैठका झाल्याचेही ते म्हणाले. यानंतर आता दोन्ही गटाकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.
साहेबांच्या डोळ्यादेखतच…
शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या नावाचा उल्लेख केल्यानंतर जयंत पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “अजित पवारांचे ज्यादिवशी निधन झाले, त्याच दिवशी सायंकाळी माध्यमांशी बोलत असताना मी यासंबंधी भाष्य केले होते. अजित पवार पूर्वी स्वतः माझ्या घरी आले होते. त्यांची आणि माझी अनेकदा चर्चा झाली होती. अनेकदा तर ते माझ्याकडे जेवायला यायचे आणि जेवणावेळीच आमची चर्चा व्हायची. साहेबांच्या (शरद पवार) देखतच मला दोन्ही पक्ष एकत्र करायचे असल्याचे त्यांचे मन होते.”
जयंत पाटील पुढे म्हणाले, “माझ्याबद्दल जनमाणसात जी प्रतिमा आहे, ती पुसून मी पुन्हा साहेबांबरोबर एकत्र येण्यास तयार आहे, असे अजित पवारांचे मन होते. यासंबंधी एकदा नाही तर दहा-बारा वेळा आमच्यात बोलणे झाले होते. बैठकीचे ठिकाण माझे घरच होते. पहिल्या दोन-तीन बैठकात तर त्यांनी आपल्या भावनाच व्यक्त केल्या. अडीच वर्षांचा कालखंड मागे टाकून पुढे जाण्याची आग्रही भूमिका त्यांची होती.”
१२ फेब्रुवारी तारीख महत्त्वाची का होती?
१२ फेब्रुवारी रोजी दोन्ही पक्ष एकत्र येणार होते, असे विधान शरद पवार यांनी केले होते. यावर प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले की, १६ जानेवारी रोजी रात्री माझ्या घरी आमच्या पक्षातील काही प्रमुख नेत्यांची आणि त्यांची बैठक झाली होती. त्यापूर्वी हर्षवर्धन पाटील, अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीतही बैठक झाली होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्र लढविण्यासंबंधी आमची चर्चा झाली.
जिल्हा परिषदेचा निकाल ७ फेब्रुवारी रोजी लागत आहे. त्यानंतर आमच्या चर्चेतून १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही गट एकत्र आल्याची घोषणा करू, असे ठरवले असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. त्यानंतर १७ तारखेला सकाळी बारामतीमध्ये जाऊन आम्ही शरद पवारांच्या कानावर हा निर्णय टाकला होता, असेही ते म्हणाले.

