माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ३० मे रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तनपुरे यांच्या भाजपा प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला मोठा धक्का बसला. प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर लगेच अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून भाजपाकडून विधानपरिषदेची उमेदवारी देखील मिळाली आहे. दरम्यान, प्राजक्त तनपुरे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?

काही दिवसांपूर्वी प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात प्रवेश आहे, तुमचं त्यांच्याबरोबर काही बोलणं झालं का? असा प्रश्न विचारला असता जयंत पाटील यांनी म्हटलं की, “जर प्राजक्त तनपुरे यांच्याशी माझं बोलणं झालं असतं, तर त्यांचा भाजपा प्रवेश टळला असता. मात्र, माझं त्यांच्याशी काहीही बोलणं झालं नाही”, असं मोठं भाष्य जयंत पाटील यांनी केलं आहे.

“आता प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे त्यांनी विचार करूनच प्रवेश केला असेल. त्यांचा जिल्हा वेगळा आहे, माझा जिल्हा वेगळा आहे, तसेच त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. ते आमदार राहिलेले आहेत, मंत्री देखील राहिलेले आहेत. त्यामुळे आता त्यांच्याबाबत मी काय बोलणार? माझं त्यांच्याशी काहीही बोलणं झालेलं नाही”, असं जयंत पाटील यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.

जयंत पाटलांनी तनपुरेंबाबत याआधी काय म्हटलं होतं?

प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर जयंत पाटील यांनी म्हटलं होतं की, “प्राजक्त तनपुरे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत मी ऐकलं. मात्र, माझा त्यांच्याशी संपर्क झाला नाही. खरं म्हणजे प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात प्रवेश करणं हे आमच्यासाठी धक्कादायक आहे. पण त्यांच्या मतदारसंघाची परिस्थिती पाहून प्राजक्त तनपुरे यांनी निर्णय घेतला असेल”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं याआधी म्हटलं होतं.

प्राजक्त तनपुरेंनी भाजपात कधी प्रवेश केला?

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षामधून ३० मे रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मागील काही महिन्यांपासून प्राजक्त तनपुरे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. एवढंच नाही तर राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीमधून देखील प्राजक्त तनपुरे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली होती. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतल्याचंही पाहायला मिळालं होतं. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यानंतर अखेर ३० मे रोजी प्राजक्त तनपुरे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

प्राजक्त तनपुरेंना भाजपाकडून विधानपरिषदेची उमेदवारी

दरम्यान, प्राजक्त तनपुरे यांनी ३० मे रोजी मुंबईत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून भाजपाकडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली.

प्राजक्त तनपुरेंनी भाजपा प्रवेशानंतर काय म्हटलं होतं?

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, सभापती राम शिंदे यांच्यासह भाजपाच्या सर्व नेत्यांचे मी आभार मानतो. कारण त्यांनी मला भाजपात प्रवेश दिला. आता आमच्या सर्व कार्यकर्त्यांची हिच अपेक्षा आहे की माझ्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लागले पाहिजे. माझा मतदारसंघ हा तीन तालुक्यांत विभागलेला असल्याने मतदारसंघातील प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वीजेचे, पाण्याचे प्रश्न सरकारच्या माध्यमातून सुटले पाहिजेत. आता मी जास्त काही बोलू शकणार नाही. पण यापुढे पक्ष आमच्यावर जी जबाबदारी देईल, ती जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचं काम करू”, असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं होतं.