राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एनसीबीवर गंभीर आरोप केलेत. एनसीबीचा वापर नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी आणि त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी केला जातोय, असा आरोप जयंत पाटलांनी केला. तसेच नवाब मलिक हे एनसीबीच्या विरोधात पुराव्यानिशी बोलत आहेत. ते सत्य असेल तर अतीशय गंभीर आहे, असंही त्यांनी म्हटलं. जयंत पाटील यांनी रत्नागिरीतील दापोली येथे पत्रकार परिषदेत घेत यावर भाष्य केलं.

“शाहरुख खानच्या मुलाच्या बाबतीत जे घडलंय ते आणखी इतरांच्या बाबतीतही झालं असेल. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.

“केंद्र सरकारच्या सेवेत जाताना फसवणूक केली असेल तर गंभीर”

जयंत पाटील म्हणाले, “समीर वानखेडे यांचं लग्न लावून देणाऱ्या व्यक्तीने काही गोष्टी सांगितल्या आहेत. आज त्याच्या मेरिटमध्ये जायचं नाहीये. योग्यवेळी ती माहिती लोकांसमोर येईल. मात्र, नवाब मलिक ज्या गोष्टी पुढे आणत आहेत सत्य आहेत असं एकंदर दिसतंय. ते जर खरं असेल तर खूप गंभीर आहे. केंद्र सरकारच्या सेवेत जाताना फसवणूक करून कुणी गेलं असेल तर ते गंभीर आहे.”

“आर्यन खानला क्रुझवर जाण्याआधीच पकडलं असेल तर…”

“एनसीबीने शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईतील क्रुझवर जाण्याआधीच पकडलं असेल तर ते गंभीर आहे. सगळाच खुलासा झाला पाहिजे. नवाब मलिक यांनी ज्या गोष्टी समोर आणल्या त्या एकट्या समीर वानखेडे यांच्या विरोधात नाहीत. एकूणच यंत्रणा कशा चुका करतात, दिशाभूल करतात हे सांगण्याचा नवाब मलिक प्रयत्न करत आहेत,” असं जयंत पाटील म्हणाले.

“पुरावे पाहिल्यानंतर आरोपांची शहानिशा होणारच”

“मूळ मुद्दा हा आहे की आयटी, ईडी किंवा एनसीबी या केंद्रीय संस्थांचा वापर करून या देशातील नागरिकांना छळण्याचं काम, बदनाम करण्याचं काम होतंय. हेच नवाब मलिक लोकांसमोर आणत आहेत. पुरावे पाहिल्यानंतर आरोपांची शहानिशा होणारच आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा : “आपले फक्त ५४ आमदार आहेत, लक्षात घ्या”, जयंत पाटलांनी दिली कार्यकर्त्यांना तंबी

जयंत पाटील म्हणाले, “एनसीबीची टीम वानखेडेंच्या चौकशीसाठी आलीय. ते वानखेडेंची चौकशी करत आहेत. वानखेडे यांनी घेतलेला दाखला आणि IRS मध्ये जो प्रवेश घेतला तो कोणत्या जातीच्या आधारावर घेतला याचं गणित लवकरच उलगडेल आणि फसवणूक कुणी केली व कशी केली याचा खुलासा देखील लवकरच होईल.” चौकशीसाठी आलेली एनसीबीची टीम खऱ्या गोष्टींची चौकशी करेल. त्यामुळे ही टिम चुकांवर पांघरूण घालण्यासाठी आली नसावी, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.