scorecardresearch

“भाजपाचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का?”, जयंत पाटलांचा हल्लाबोल

ईडी काय महाराष्ट्रातच आहे का? भाजपाचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का? असा रोखठोक सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.

मविआचे निवडून आलेले आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते शक्य झाले नाही म्हणून ईडी, इन्कम टॅक्सची धाड टाकली जात आहे. ईडी काय महाराष्ट्रातच आहे का? भाजपाचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का? असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. आजपासून (११ एप्रिल) राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाला रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघातून झाली. यावेळी जयंत पाटील बोलत होते. त्यांनी उरण विधानसभा मतदारसंघाचा आढावा देखील घेतला.

जयंत पाटील म्हणाले, “धाडसत्रांना घाबरत नाही म्हणून काही लोक आणखी अस्वस्थ झाले आणि त्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेकीचा हल्ला घडवून आणला. शरद पवार नेहमीच एसटी कामगारांसाठी लढले, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, मात्र काहींनी एसटी कामगारांना भडकावण्याचा प्रयत्न केला. आझाद मैदानात चिथावणीखोर भाषणे दिली. त्यातून हे घडले.”

“दुध का दुध पानी का पानी होणारच, पण…”

“आता सध्या अटक झालेल्या लोकांची चौकशी सुरू आहे. दुध का दुध पानी का पानी होणारच, पण इतरांवरही कडक कारवाई करावी,” अशी मागणी जयंत पाटील यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर चालतो. जातीयवादी पक्षांना राष्ट्रवादीच उत्तर देऊ शकते हे लोकांना आता पटले आहे, असेही जयंत पाटील यांनी नमूद केले.

“संघर्षानंतर विजय आपलाच असतो, म्हणून खचून जावू नका”

जयंत पाटील म्हणाले, “‘Everyday is chance to get better’ त्यामुळे निराश व्हायचं नाही, संघर्ष असतोच. मात्र, त्या संघर्षानंतर विजय आपलाच असतो. म्हणून खचून जावू नका. २०१९ साली विधानसभा निवडणुकीचा काळ होता, सर्व नेते सोडून जात होते. पक्ष काही टिकणार नाही, १०-१५ आमदार निवडून येतील असे भाकित केले गेले मात्र आपले नेते शरद पवार बाहेर पडले आणि काँग्रेस व राष्ट्रवादीने १०० आमदार निवडून आणले.”

“महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत शरद पवार यांना मानणारे लोक”

“चांद्यापासून बांद्यापर्यंत शरद पवार यांना मानणारे लोक महाराष्ट्रात आहेत. त्याच लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि राज्यात परिवर्तन झाले. मावळ लोकसभा निवडणुकीत उरणमधून राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली मते मिळाली. मोदी लाट असताना, पक्ष पहिल्यांदा निवडणूक लढवत असताना पक्षाने एक चांगला रिझल्ट दिला,” असं नमूद करत जयंत पाटील यांनी प्रत्येक कार्यकर्त्याचे अभिनंदन केले.

हेही वाचा : “मी आमदार झाल्यापासून जयंत पाटलांना सुचायचं बंद झालंय”, गोपीचंद पडळकरांची खोचक टीका!

“अदिती तटकरे पालकमंत्री म्हणून चांगले काम करत आहे, आपण तिला साथ द्या. इथे बुथ कार्यकर्ते घडवा, सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवा जेणेकरून तो माणूस कायमस्वरूपी राष्ट्रवादीशी जोडला जाईल. प्रशांत पाटील अतिशय चांगले काम करत आहे, मला खात्री आहे ते अधिक मेहनत घेऊन या भागात राष्ट्रवादीचा झेंडा रोवतील,” असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jayant patil criticize bjp over ed it raids on mva leaders in maharashtra pbs

ताज्या बातम्या