मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक होऊ लागले आहेत. राज्य सरकारने मराठा समाजासाठी १० टक्के स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केली आहे. परंतु, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. यासाठी ते आंदोलन करत आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर काही आरोप केले आहेत. जरांगे पाटील यांनी प्रामुख्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस मला विष देऊन किंवा इतर मार्गांनी ठार करण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांनी मनोज जरांगेंविरोधात भूमिका घेतली आहे. दरम्यान, मनोज जरांगेंना कोणाचं पाठबळ आहे, याची चौकशी करा, या मागणीने जोर धरला होता. आज (२७ फेब्रुवारी) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा सभागृहात तीच मागणी केली. शेलार यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या चौकशीची मागणी केली. यावरून सभागृहात प्रचंड खडाजंगी झाली.

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी सभागृहात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली. तसेच ते म्हणाले, महाराष्ट्र बेचिराख करायची भाषा कोणी करत असेल तर त्या भूमिकेविरोधात विरोधक उभे राहतील, असा आमचा विश्वास आहे. महाराष्ट्र बेचिराख करण्याची केवळ धमकी आहे का? यामागची भूमिका काय? त्यासाठी कटकारस्थान-योजना केली आहे का? याबाबत गांभीर्याने विचार करावा लागेल. कारण, आता मराठा समाजाचीही बदनामी होतेय. महाराष्ट्रात पंतप्रधानांची सभा उधळून टाकू, असं म्हटलं जातंय. हा कटकारस्थानाचा भाग आहे. या विषयाची गंभीर नोंद घेतली पाहिजे.

आशिष शेलार म्हणाले, “हे सगळं घडवणारे मनोज जरांगे राहतात कुठे हे शोधलं पाहिजे. जिथून दगडं आणली तो कारखाना कोणाचा आहे हे शोधलं पाहिजे. या आंदोलनाला जेसीबी आणि ट्रॅक्टर कोणाच्या कारखान्यातून आले. या सगळ्यामागे एखादी मोठी व्यक्ती असावी.” शेलार यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे रोख केला. तसेच ते म्हणाले, एका कारखान्याच्या मालकाचा यात सहभाग आहे, त्यामुळे याप्रकरणी चौकशीसाठी एसआयटी लावा” त्यापाठोपाठ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा केली.

मनोज जरांगेंच्या मागे शरद पवार आहेत असा आरोप संगीता वानखेडे यांनी केला होता. संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर वेगवेगळे गंभीर आरोप केले आहेत. याच संगीता वानखेडेंच्या दाव्यांच्या दाखला देत सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांविरोधात आणि प्रामुख्याने शरद पवारांविरोधात आक्रमक झाले आहेत. दरम्यान, आता वानखेडे यांनी यापूर्वी ज्यांच्यावर आरोप केले होते त्या प्रकरणांचीदेखील एसआयटीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

हे ही वाचा >> मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितल्या पाच जमेच्या बाजू; मनोज जरांगेंना म्हणाले…

जयंत पाटील काय म्हणाले?

जयंत पाटील म्हणाले, संगीता वानखेडे यांनी काही दिवसांपूर्वी, जुलै २०२० मध्ये सत्ताधारी पक्षातील आमदाराविरोधात विनयभंगाचे आरोप केले होते. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करायला हवी. चौकशी करा आणि दूध का दूध, पाणी का पाणी करून दाखवा. आम्हाला काही अडचण नाही. संगीता वानखेडे यांनी पूर्वी एका विधानसभा सदस्यावर आरोप केला होता, त्यासाठीदेखील एसआयटी जाहीर करावी.