मुंबई : सभागृहात नियमित होणारे कामकाज म्हणजे लक्षवेधी, असे चित्र निर्माण केले गेले. मला समजत नाही हे अधिवेशन आहे की लक्षावेधीशन आहे. जनतेच्या करातून हे सभागृह, राज्य चालते. जनतेच्या कष्टाची चीज झालं पाहिजे. मागील महिन्याभरात कधी मंत्री तर कधी अधिकारी अनुपस्थित होते. अशा पद्धतीने सभागृह चालते. हे मी आतापर्यंत कधीच पाहिलेलं नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सभागृहातील कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधकांनी अधिवेशनातील कामकाजावर ताशेरे ओढले. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले यांनी अशोक खरात प्रकरणावरून गंभीर आरोप केले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी इतके सभागृह यापूर्वी मोकळे कधीच पाहिले नाही. सभागृहातील मुख्यमंत्री आणि मंत्री हे बाहेर गेली की आमदार त्यांची कामे करण्यासाठी मागे जातात. सरकार सकाळी विधेयक मांडते आणि दुपारी मंजूर करण्याचा हट्ट करते.

चार प्रस्ताव एकत्र चर्चा केली जातात. त्यावरील उत्तरही एकत्रित दिली जातात १८ ते २० लक्षवेधी दिवसाला मांडल्या जातात. त्यावरून हे अधिवेशन म्हणजे लक्षाविधिशन झाले आहे. सदस्यांच्या मनातील वाफ निघायला कुठे वाव राहिला नाही. त्यांना बोलून दिले जात नाही. सभागृहाचे महत्त्व कमी होता कामा नये, असे मत पाटील यांनी व्यक्त केले

प्रत्येक सदस्याच्या अंगावर पोलीस येऊ शकतात हे सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या घटनेवरून दिसून आले आहे. मंत्र्यांच्या अंगावर पोलीस धावून जाऊ शकतात तर तुम्ही आम्ही ‘किस झाड की पत्ती’ आहोत असे पाटील यांनी सांगितले राज्यातील द्राक्ष केळी उत्पादकांवर संकट कोसळलेले आहे. अवकाळी पाऊस, महागाई, भाव वाढ, कर्ज,युद्ध यात फक्त शेतकरी मरत आहे, असे ते म्हणाले. अजित दादा पवार यांच्या झालेल्या अपघातावर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास बसत नाही त्यामुळे या घटनेतील घटनेत काही काळेभेर आहे का, हे सरकारने शोधून काढले पाहिजे असे पाटील यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, लक्ष्मण पाटील यांच्या जिल्ह्यात मंत्र्यांना धक्काबुक्की सहन करावी लागली. इतकी कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. लोकशाहीची पायमल्ली झाली आहे. एकनाथ शिंदे यांना सभागृहात येऊन सांगावे लागते. साताऱ्यातील घटनाही महाराष्ट्राला लाज आणणारी आहे. अशोक खरात ला सरकारने पैसे दिले आहेत त्याला राजमान्यता मिळालेली होती.

घरात ने २००७ मध्ये बाळू तुपे या पत्रकाराच्या नाशिकमध्ये खून केला आहे. खरात याला वाचवण्यासाठी एक उच्च पोलिस अधिकाऱ्याने दोन कोटी रुपये घेतले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न होता. मुख्यमंत्री थोड्या दिवसात घरी जातील, असा विश्वास खरात यांनी दिला होता. काळया जादूला इतकी मान्यता प्राप्त झाली आहे, असे गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

३८ आमदार खरातच्या संपर्कात होते. खरातचा जेफ्री एपस्टीन प्रमाणे खून होऊ शकतो. त्यामुळे त्याला पूर्ण वेळ सीसीटीव्ही कॅमेराच्याच्या नजरेत ठेवण्यात यावे. अशी मागणी आव्हाड यांनी केली. अधिवेशन काळात भोंदू बाबाचे प्रकरण बाहेर आले. महिलांचे शोषण करण्यासाठी खरात देवाचे नाव घेत होता. यामुळे सनातन हिंदू धर्माची बदनामी होत आहे. त्यासाठी सरकारने धोरण ठरवले पाहिजे. खरातच्या घरी आश्रमातरी देशाचे गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री, आमदार जात होते. त्यांच्या या कृत्याची माहिती नाशिक पोलिसांनी या नेत्यांना का दिली नाही, असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला.