Ashok Kharat Case Anjali Damania CDR Allegations : नाशिकचा भोंदू अशोक खरात याचे अनेकविध कारनामे रोज समोर येत आहे. एसआयटीकडून त्याची सखोल चौकशी सुरू असून एसआयटीने आज गोणीभरून कागदपत्रे जप्त केली आहेत. दरम्यान, अशोक खरातला मदत करणाऱ्यांमध्ये अनेक राजकीय तसंच शासकीय अधिकाऱ्यांचाही हात असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातील महत्त्वाच्या नेत्याचंही नाव घेतलं आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत आज अनेक नेत्यांची नावे जाहीर केली.
राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी खरातला मोठं केलं, असा दावा अंजली दमानिया यांनी केला. त्यातील काही राजकारणी नुसतेच भविष्य वगैरे बघायला गेले होते. पण काही राजकारणी काहीतरी साध्य करायला गेले असतील, असं म्हणत त्यांनी अशोक खरातकडे गेलेल्या काही नेत्यांची आणि त्यांच्या पीए यांची नावेच जाहीर केली आहेत.
“नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटलांचे पीए मंगेश देशपांडे, सिन्नरमधील पराभूत उमेदवार उदय सांगळे, विधान परिषदेचे आमदार शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, दादा भुसेंचे पीए रामदास खेडकर, दीपक केसरकर, एकनाथ शिंदे, प्रभाकर काळे, सुनील तटकरे आणि शरद पवार पक्षाचे जयंत पाटील”, आदींची नावे अंजली दमानिया यांनी वाचून दाखवली. त्या पुढे म्हणाल्या, जयंत पाटलांकडून मला अशी अपेक्षा नव्हती. बाबांकडे ते भविष्य विचारायला जातील असं मला वाटलं नव्हतं. हे जाणून मला दुःख झालं. मला ती व्यक्ती चांगली वाटत होती.”
चाकणकर कुटुंबीयातील कोण कोण अशोक खरातच्या संपर्कात?
“चाकणकर कुटुंबातील, रुपाली चाकणकर, मुलगा सोहम चाकणकर, प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल चाकणकरांचीही नावे यादीत सांगितली आहेत”, असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
रुपाली चाकणकर धनंजय मुंडेंप्रमाणेच बोलत आहेत
“रुपाली चाकणकरांनी फेसबूक पोस्ट लिहिली आहे. धनंजय मुंडे जे बोलत होते, अगदी तसंच आता रुपाली चाकणकर बोलत आहेत. मिडिया ट्रायल, माझ्याविरोधात पुरावा दिला जात नाहीय, असे तेच शब्द रुपाली चाकणकरांचे आहेत. धनंजय मुंडेप्रमाणेच रुपाली चाकणकरही गायब आहेत”, असा दावाही त्यांनी केला.
खरातला सर्वाधिक फोन कोणाचे?
अशोक खरातला सर्वाधिक फोन कोणाचे आले होते? याचाही अहवाल अजंली दमानिया यांनी आज वाचून दाखवला. पहिल्या क्रमांकांवर तृप्ती खरात(अशोक खरातची मुलगी), दुसऱ्या क्रमांकावर रुपाली चाकणकर, तिसऱ्या प्रकरणावर दीपक लोंढे, चौथे कल्पना खरात (अशोक खरातची पत्नी) आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, दीपक लोंढे हे अशोक खरातच्या सर्वाधिक जवळचे होते आणि दीपक लोंढे केसरकरांच्याही अतिशय जवळचे आहेत.” यावेळी त्यांनी दीपक लोंढे आणि दीपक केसरकरांच्या भेटींचे अनेक फोटोही माध्यमांना दाखवले.
