scorecardresearch

सोलापुरात राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना जयंत पाटलांच्या कानपिचक्या

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी तयार करताना त्यात अनेकांना पदे दिली.

karnataka hijab row Jayant Patil role on hijab issue
(संग्रहित छायाचित्र)

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी तयार करताना त्यात अनेकांना पदे दिली. परंतु पक्षाच्या वाढीसाठी कोणीही प्रयत्न करीत नसून स्वत:च्या फायद्यासाठीच पदाचा वापर होणार असेल तर त्यांना खडय़ासारखे बाजूला काढले जाईल, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या स्थानिक पदाधिकांऱ्यांना कानपिचक्या दिल्या. परिवार संवाद यात्रा घेऊन आलेले पाटील यांनी पक्षाच्या वाटचालीची जिल्हास्तरीय आढावा बैठक घेतली. त्यावेळी पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीत चाललेला गोंधळ पाहून त्यांनी नाराजी व्यक्त करीत इशारावजा सूचना दिल्या. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आदी उपस्थित होते. सुशील रसिक सभागृहात झालेल्या या बैठकीत जयंत पाटील यांनी जिल्हा ग्रामीण कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

पक्षाच्या जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी प्रास्तविक करताना जिल्ह्यातील पक्षांतर्गत वाद, पदाधिकाऱ्यांची पक्षवाढीसाठी असलेली निष्क्रियता यावर बोट ठेवत गाऱ्हाणे मांडले. त्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. काही पदाधिकारी व कार्यकर्ते वारंवार मुंबई-पुण्यात येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कान भरतात. असे प्रकार यापुढे चालणार नाहीत. पक्ष संघटनेच्या कामात सुसूत्रता दिसली नाही म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली. पाटील यांनी सोलापूर शहर कार्यकारिणीच्या बैठकीतही शहरातील विधानसभास्तरीय पक्षाच्या कामाचा आढावा घेतला. शहरात पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. महापालिकेतही पक्षाचे नगरसेवक जेमतेम आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळवायचे आहे. दुसऱ्या पक्षातील अनेक नेते व कार्यकर्ते आपल्या पक्षात येत आहेत. नव्या आणि जुन्या नेत्यांना एकत्र येऊन काम करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jayant patil ncp office bearers political party politics ysh

ताज्या बातम्या