शिवसेना आमदारांचा एक मोठा गट एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली फुटून बाहेर निघण्याच्या तयारीत असताना त्यामुळे राज्य सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार वाचवण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. गुरुवारी दिवसभर यासंदर्भात तिन्ही पक्षांच्या बैठका सुरू होत्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यात नेमकं काय घडणार आहे? याविषयी सध्या संभ्रमावस्था असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“अशा परिस्थितीतून शरद पवार नेहमीच मार्ग काढत आले आहेत”

जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांवर विश्वास दर्शवला आहे. “सरकार राहावं हीच आमची भूमिका आहे. शेवटपर्यंत हे सरकार टिकावं यासाठी उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभं राहाण्याचे निर्देश शरद पवारांनी आम्हाला दिले आहेत. अशा प्रकारच्या आणीबाणीच्या परिस्थितीतून शरद पवार नेहमीच मार्ग काढत आले आहेत. आज आमदार ब्लॅक कॅट कमांडोंच्या घेरावात अडकले आहेत. एका हॉटेलमध्ये किल्ल्याचं स्वरूप करून तिथे त्यांना ठेवलं आहे. जेव्हा हे आमदार मुंबईत येतील आणि उद्धव ठाकरेंसमोर जातील, तेव्हा हे चित्र बदलेल असा आम्हाला विश्वास आहे”, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

“खरं कारण योग्य वेळी तुम्हाला सांगेन”

दरम्यान, यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी शिवसेनेच्या आमदारांच्या बंडखोरीमागचं खरं कारण योग्यवेळी सांगेन, असं सूचक विधान केलं आहे. “अशा गोष्टी होतच असतात. आमदारांची कामं कधी होतात, कधी होत नाहीत. वरिष्ठांच्या भेटी कधी होतात, कधी होत नाहीत. पण त्याचा परिणाम सरकारवर कधी होत नसतो. पण काही वेगळ्या कारणाने काही लोक बाजूला जात असतील, तर ती कारणं समोर येत नाहीत. फक्त हिंदुत्वाचा मुद्दा समोर येतो. पण खरं कारण काय आहे, ते योग्य वेळी मी तुम्हाला सांगेन”, असं ते म्हणाले.

“बहुमत आहे म्हणून सत्तेत आहोत, बहुमत गेलं तर…”, जयंत पाटलांनी स्पष्ट केली राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका!

“शिवसेनेच्या आमदारांना टिकवणं अडचणीचं”

“आज हे सरकार टिकवण्यासाठी शिवसेनेच्याच आमदारांना टिकवणं महत्त्वाचं पण अडचणीचं झालं आहे. परिस्थिती बदलली आहे. शिवसेना एकगठ्ठा राहिली, तर आजही हे सरकार टिकेल. शरद पवार स्वत: त्यासाठी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटून आले आहेत”, असं पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

“राष्ट्रवादीच्या आमदारांनी कधी अशी भूमिका घेतली नाही”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी कधीही शिवसेना आमदारांसारखी भूमिका घेतली नसल्याचं जयंत पाटील म्हणाले. “आमच्या सरकारने अनेक चांगले उपक्रम केले. आज दुर्दैवाने काही शिवसैनिक सांगत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नको. अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन करून तिन्ही पक्षांनी एकत्र काम केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी काहीही अडचण असली, तरी इतर पक्षांच्या विरोधात भूमिका घेतली नाही. उलट, शरद पवारांनी निर्णय घेतला, तर त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहू अशी भूमिका त्यांनी घेतली. माझ्या पक्षाच्या आमदारांनी उघडपणे कधी अशी भूमिका घेतली नाही. विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीतही आमचा पक्ष एकसंध राहिला”, असं देखील जयंत पाटील म्हणाले.