Jayant Patil On BJP : राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीनंतर आता राज्यभरात जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींच्या घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. यातच सांगली जिल्हा परिषदेची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. सांगली जिल्हा परिषदेत भाजपा महायुतीचा अध्यक्ष होणार असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
तसेच चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्यांबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं होतं. त्यांना व्हीप पाळावा लागेल, अन्यथा अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असा सूचक इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला होता.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘भाजपाकडून अजितदादांच्या राष्ट्रवादीवर दादागिरी करण्यात येत आहे’, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटलांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जयंत पाटील काय म्हणाले?
“घड्याळाबरोबर आमची आघाडी होती. मग घड्याळावर निवडून आलेल्या उमेदवारांना भारतीय जनता पक्ष दम कसंकाय देऊ शकतो? घड्याळ हा स्वतंत्र पक्ष आहे, म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे. मग असं असताना भाजपाच्या नेत्यांनी दमदाटी करणं किंवा भाजपाच्या एखाद्या नेत्यांने त्यांना नियम सांगणं म्हणजे एका पक्षाची दुसऱ्या पक्षावर दादागिरी सुरू आहे असा त्याचा अर्थ होतो”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटलांनी काय इशारा दिला होता?
“महायुती म्हणून एकत्र येण्याचं ठरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे सदस्य हे घड्याळ चिन्हावर निवडून आले आहेत, त्यांना पक्षाचा व्हीप पाळावा लागेल. अन्यथा ते अपात्र होऊ शकतात”, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला होता. त्यांच्या याच वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील प्रतिक्रिया दिली आहे.

