Jayant Patil On BJP : राज्यात विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राजकीय नेत्यांचे महाराष्ट्रात सध्या दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून सभा, मेळावे, आढावा बैठका घेत आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. तसेच उमेदवारांची चाचपणीही केली जात आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला कोल्हापूरमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपाचे नेते समरजितसिंह घाटगे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि समरजितसिंह घाटगे एका मेळाव्यात एकत्र आले होते. यावेळी जयंत पाटील यांनी बोलताना समरजितसिंह घाटगे यांच्या पक्ष प्रवेशाची तारीख जाहीर केली. तसेच जयंत पाटील यांनी यावेळी भारतीय जतना पार्टी आणि अजित पवार गटाचे नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांना सूचक इशाराही दिला. “आम्ही टप्प्यात आल्यानंतर लगेच कार्यक्रम करतो”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.
हेही वाचा : मोठी बातमी! मविआचा उद्याचा ‘महाराष्ट्र बंद’ मागे; शरद पवार, नाना पटोलेंनंतर उद्धव ठाकरेंकडूही भूमिका स्पष्ट
जयंत पाटील काय म्हणाले?
“माझ्या डोक्यात असणारी चिंता आज संपत आहे याचा आनंद मी व्यक्त करतो. ज्यावेळी सर्व लोक सोडून जातात तेव्हा सर्व बहुजन समाज कसा एकवटतो हे तुम्ही कोल्हापूरच्या लोकसभा निवडणुकीत दाखवून दिलं. आता त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला विधानसभेला कागलमध्ये करायची आहे. समरजितसिंह घाटगे यांना आम्ही गेल्या काही दिवसांपासून सुचवत होतो की, आपण या वेगळ्या मार्गाचा विचार करा. हा मार्ग आपल्या ग्रामीण भागातील जनतेला मान्य असणारा मार्ग आहे. लोकांच्या समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, अल्पसंख्यांकांच्या प्रश्नांसह सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आज महाविकास आघाडी महाराष्ट्रात एकसंघपणे काम करत आहे. त्यामुळे आपल्याला हा निर्णय लवकर करावा, अशी विनंती मी त्यांना करत होतो”, असं जयंत पाटील म्हणाले.
“आज सकाळी समरजितसिंह घाटगे यांनी मला मेसेज पाठवला आणि म्हणाले तुम्ही या आणि माझ्या कार्यकर्त्यांशी तुम्ही एकदा बोलले तर बरं होईल. ते म्हणाले उद्या, परवा कधीही या. पण आम्ही टप्प्यात आल्यानंतर लगेच कार्यक्रम करतो. उद्या परवा नाही तर आजच येतो”, असं म्हणत जयंत पाटील यांनी भारतीय जनता पार्टीला सूचक इशारा दिला.
समरजितसिंह घाटगेंचा पक्षप्रवेश कधी?
“या मतदारसंघातील प्रत्येक बूथवरून जास्तीत जास्त लोक आणून आपल्याला ऐतिहासिक न भूतो न भविष्यति अशी सभा आपल्याला 3 तारेखला करायची आहे. समरजित घाटगे यांचं मी पक्षात स्वागत करतो. 3 सप्टेंबरला अधिकृत प्रवेश त्यांचा होईल. त्या प्रवेशानंतर कागल मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष दिमाखाने डौलायला लागेल”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
© IE Online Media Services (P) Ltd