राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज (३० मे) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्त तनपुरे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर आज अखेर प्राजक्त तनपुरे यांनी मुंबईत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजपा प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, प्राजक्त तनपुरे यांच्या भाजपा प्रवेशावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा माजी मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत मोठं भाष्य केलं आहे.’प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात प्रवेश करणं हे आमच्यासाठी धक्कादायक आहे’, असं जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?

प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “प्राजक्त तनपुरे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत मी देखील ऐकलं. मात्र, माझा त्यांच्याशी संपर्क झाला नाही. खरं म्हणजे प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात प्रवेश करणं हे आमच्यासाठी धक्कादायक आहे. पण त्यांच्या मतदारसंघाची परिस्थिती पाहून प्राजक्त तनपुरे यांनी निर्णय घेतला असेल असं मला वाटतं”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजपा प्रवेशानंतर प्राजक्त तनपुरेंनी काय प्रतिक्रिया दिली?

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, सभापती राम शिंदे यांच्यासह भाजपाच्या सर्व नेत्यांचे मी आभार मानतो, त्यांनी मला भाजपात प्रवेश दिला. आमच्या सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की माझ्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. माझा मतदारसंघ हा तीन तालुक्यांत विभागलेला आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रश्न मार्गी लागावे, मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वीजेचे, पाण्याचे प्रश्न सरकारच्या माध्यमातून सुटावेत. अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे. मी आज जास्त काही बोलू शकणार नाही. मात्र, यापुढे पक्ष आमच्यावर जी जबाबदारी देईल, ती जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचं काम करू असा विश्वास देतो”, असं प्राजक्त तनपुरे यांनी भाजपा प्रवेशानंतर बोलताना म्हटलं आहे.

प्राजक्त तनपुरेंना भाजपाकडून विधानपरिषदेची उमेदवारी?

राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरू असून आज महायुतीच्या जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे. यातच आज प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात प्रवेश केला असून त्यांना अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून भाजपाकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा आहेत.

राहुरी पोटनिवडणुकीतून तनपुरेंनी घेतली होती माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली होती. या भेटीवेळी रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील आणि प्राजक्त तनपुरे यांच्यात महत्वाची चर्चा झाल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील फोनवरून प्राजक्त तनपुरे यांचं तेव्हा मन वळवल्याची चर्चा होती.