मुंबई : केंद्र सरकार अमृतकाळाची जाहिरात करीत आहे. पण, आर्थिक परिस्थिती पाहता देश विकासाच्या मार्गावर आहे की, आर्थिक मंदीच्या वळणावर ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
जयंत पाटील यांनी या बाबत समाज माध्यमात एक संदेश प्रसारित केला आहे. त्यात म्हटले आहे, केंद्र सरकारकडून अमृतकाळच्या जाहिराती सुरू आहेत, पण अर्थव्यवस्थेची स्थिती वेगळीच आहे. मे महिन्यात एप्रिलच्या तुलनेत जीएसटी संकलनात २० टक्क्यांनी म्हणजे जवळपास ५० हजार कोटींची मोठी घट झाली आहे.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार महागाई दर ४.६ टक्क्यांवरून ५.१ टक्क्यांवर गेला आहे. सकल देशांतर्गत उत्पादनाचा दर ६.९ टक्क्यांवरून ६.६ टक्क्यांवर घसरण्याचा अंदाज आहे. जेव्हा महागाई वाढते, तेव्हा विकासाचा वेग कमी होतो आणि सामान्य नागरिकाची क्रयशक्ती घटते. त्यामुळे अर्थव्यवस्थेची खरी अवस्था सरकारी जाहिरातींमधून नाही तर बाजारातून दिसते. देशातील तरुण रोजगारासाठी झगडत आहेत, उद्योग गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगत आहेत. सामान्य कुटुंबांचा खर्च वाढत आहे. त्यामुळे देश विकासाच्या मार्गावर आहे की, आर्थिक मंदीच्या धोकादायक वळणावर ? असा प्रश्नही त्यांना उपस्थित केला आहे.
आर्थिक मंदीच्या संकटाकडे वेळीच लक्ष द्या – रोहित पवार
महागाई बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढत असून, लोकांचे उत्पन्न देखील त्याच वेगाने घसरत आहे. केंद्र सरकारच्या हातातील कळसूत्री बाहुले असलेल्या रिझर्व्ह बँकेला काही प्रमाणात का होईना आकडेवारी द्यावीच लागत आहे. सर्व गोष्टींचे सोंग करता येते. परंतु पैशाचे सोंग करता येत नाही. केंद्र सरकारने कोणतंही सोंग न करता देशावर घोंगावणाऱ्या मंदीच्या संकटाकडे वेळीच लक्ष द्यावे, अन्यथा सर्वसामान्य उध्वस्त होतील, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.
