Jayant Patil vs Shambhuraj Desai on Ladki Bahin Yojna : विधानसभेमध्ये लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी आणि ई-केवायसी प्रक्रियेबद्दल बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार) आमदार जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले, “या योजनेमुळे राज्य सरकाचा फायदा झाला. महायुती परत सत्तेत आली. परंतु, आमचा एक नंबरचा माणूस दोन नंबरला जाऊन बसला. हा महाराष्ट्राचा मोठा तोटा आहे.” यावर शंभूराज देसाई म्हणाले, “दोन नंबरवरील माणूस पुन्हा एक नंबरवर येऊ शकतो.”
जयंत पाटील म्हणाले, “लाडकी बहीण योजना आणणारा व्यक्ती आज दोन नंबरवर आला, असं शिवसेना नेते शंभूराज देसाई एका ठिकाणी म्हणाले होते. खरंतर एक नंबरचा माणूस आज इथे नाही म्हणून मंत्री देसाई एक व दोन नंबरबाबत बोलत आहेत.” त्यावर शंभूराज देसाई म्हणाले, “मी काही वेगळं बोललो नाही. मुख्यमंत्री स्वतःच म्हणाले होते की आम्ही आमच्या आमच्यात पद बदलत असतो. त्यावरून मी तसं म्हटलं.”
“पदांची अदबाबदल होत असते”, शंभूराज देसाईंचं उत्तर
मंत्री देसाई यांचं उत्तर ऐकून जयंत पाटील म्हणाले, “लाडकी बहीण योजनेचा सरकारला फायदा झाला मात्र, ज्या मुख्यमंत्र्यांनी ही योजना आणली ते मात्र एक नंबरवरून दोन नंबरवर गेले.” यावर शंभूराज देसाई म्हणाले, “एकनाथ शिंदे हे कायम दोन नंबरवर राहतील असं काही नाही, पदांची अदलाबदल होत असते.”
एक नंबर, दोन नंबरमुळे एकनाथ शिंदेंचं मोठं नुकसान झालं : जयंत पाटील
जयंत पाटील म्हणाले, आमचा लाडकी बहीण योजनेला पूर्ण पाठिंबा आहे, आमचा एकनाथ शिंदेंना देखील पाठिंबा आहे. या योजनेमुळे राज्य सरकाचा फायदा झाला. महायुती परत सत्तेत आली. परंतु, आमचा एक नंबरचा माणूस दोन नंबरला जाऊन बसला. हा महाराष्ट्राचा मोठा तोटा आहे. सरकारची स्थिती काही असली तरी एक नंबर हा एक नंबरच असतो. या एक नंबर व दोन नंबरमुळे एकनाथ शिंदेंचं मोठं नुकसान झालं आहे.”
आमदार पाटील म्हणाले, “लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया व्यवस्थित झाली नाही. त्यासाठी आधीच्या सरकारपासून या पदावर असलेल्या मंत्री महोदयांना (आदित्य तटकरे) जबाबदार धरलं पाहिजे.”
