सांगलीत जयंत पाटील यांची कसोटी!

सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर असताना जिल्ह्य़ात राष्ट्रवादीमध्ये शैथिल्य आले आहे.

जयंत पाटील

विधान परिषदेच्या सांगली-सातारा प्राधिकारी मतदारसंघातील पराभवानंतर इस्लामपूर, तासगाव हे बालेकिल्ले नगरपालिका निवडणुकीत उद्ध्वस्त झाल्याने आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर असताना जिल्ह्य़ात राष्ट्रवादीमध्ये शैथिल्य आले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीमध्ये विजय मिळविल्याने नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांचाही विश्वास वाढला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसच्या बठका एकीकडे सुरू असताना, भाजप स्वबळाबरोबरच मित्र पक्षांनाही सोबत घेऊन आखाडे आखीत आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम हे स्वत: तालुकास्तरावर बठका घेऊन मोच्रेबांधणी करीत आहेत, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हे खासदार संजयकाका पाटील यांच्याशी असलेले वैरत्व विसरून एका व्यासपीठावरून पक्षबांधणीसाठी कामाला लागले आहेत.

या पाश्र्वभूमीवर जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता असलेला राष्ट्रवादी मात्र अद्याप कोमात आहे. जतच्या कृषी प्रदर्शनावरून निर्माण झालेला वाद ही एक झलक होती. आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला बालेकिल्ला असलेल्या वाळव्यातच घेरण्याची तयारी सर्वच विरोधकांनी सुरू केली आहे. नगरपालिका निवडणुकीतील विकास आघाडीचा पॅटर्न राबवून आमदार जयंत पाटील यांना पुन्हा एकदा वाळव्यातच गुंतवून ठेवण्याची रणनीती अवलंबली जाण्याची चिन्हे आहेत.

जतमध्ये काँग्रेसला अनुकूल वातावरण असताना एके काळी भाजपचे आमदार विलासराव जगताप यांच्यामुळे जनसुराज्य शक्तीशी आघाडी करून राष्ट्रवादीने यश मिळवले होते. मात्र, आज जनसुराज्य भाजपबरोबर आहे. तर पक्षाचे नेते म्हणून पुढे करण्यात आलेले प्रकाश शेंडगे यांचा प्रभाव डफळापूर परिसर वगळता फारसा नाही.  तिकडे विटय़ात राष्ट्रवादी म्हणून ओळख असणारा गट आमदार अनिल बाबर यांच्याबरोबर शिवसेनेत डेरेदाखल झाला आहे.

मिरज तालुक्यातील राजकारण बहुपदरी आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला भरभरून साथ देणारा मतदार भाजपच्या दावणीला बांधण्यात आमदार सुरेश खाडे फारसे प्रयत्नशील नसले तरी राष्ट्रवादीकडेही आजच्या घडीला फारसा उत्साहवर्धक चेहरा या तालुक्यात दिसत नाही.

कवठेमहांकाळ तालुक्यात आर. आर. आबांच्या पश्चात आ. सुमनताई पाटील यांना पक्ष विस्तारासाठी पालकत्व घेतलेल्या जयंतरावांनी फारसे लक्षच दिलेले नाही. यामुळे केवळ आर. आर. आबांचे नाव पुढे करून मतदान होईल अशी स्थिती दिसत नाही.कडेगाव-पलूसमध्ये क्रांती कारखान्याचे अरुण लाड पदवीधर निवडणुकीपासून पक्षीय पातळीवर फारसे सक्रिय दिसत नाहीत. या ठिकाणी काँग्रेसचा बालेकिल्ला डॉ. पतंगराव कदम यांना आ. मोहनराव कदम यांची साथ मिळणार असली तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष देशमुख यांचा गटही ताकदवान आहे. यामुळे येथेही राष्ट्रवादीला संधी कमीच असल्याचे सध्या तरी दिसत आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या गुगलीने संभ्रम

जिल्ह्यतील राष्ट्रवादी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अद्याप कोमात असताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचा मोहरा असलेले आमदार जयंत पाटील यांनाच भाजपच्या वळचणीला येण्याचे आवाहन करून खळबळ उडवून दिली. मात्र, पक्षात बेदिली माजावी हाच यामागील हेतू आहे हे स्पष्ट आहे. इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर जयंतरावांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्य़ाचे नेतृत्व करणाऱ्या जयंतरावांची जिल्हा परिषद निवडणुकीत कसोटी लागणार आहे.जिल्हा परिषदेत पराभवाला सामोरे जावे लागल्यास जयंतरावांना मोठा धक्का असेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jayant patil zp election in sangli