सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप पक्षाच्या ‘कमळ’ चिन्हावरच लढविणार असून पालिका निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा जिथे शक्य आहे तेथे समविचारी पक्षाशी युती करण्यात येईल, अन्यथा युती होणार नाही असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तेथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यापूर्वी वाईत पक्षाचा नगराध्यक्ष होता. आताही भाजपचा नगराध्यक्ष होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या पक्ष प्रवेशाप्रमाणे आणखी काही प्रवेश करणार आहेत काय, या प्रश्नावर ते म्हणाले, अनेकजण पक्षात येण्यास उत्सुक आहेत. योग्यवेळी त्यांचा प्रवेश होईल. सत्ताधारी पक्षाला उमेदवार मिळत नसल्याने आमचा आयात उमेदवार घेऊन त्यांना लढावे लागत आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचा खोचक टोला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला. पक्षाच्या आचारसंहितेनुसार नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेऊन यादी प्रांतिककडे सादर केली असून तेथून मान्यता आल्यानंतर सर्व उमेदवार एक दोन दिवसांत जाहीर केले जातील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मदनदादा यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी गोरे यांनी माजी आमदार मदन भोसले, भाजपा युवा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा डॉ. सुरभी भोसले-चव्हाण, माजी नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्याशी तसेच निष्ठावंत कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली.

पालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांशी संवाद साधून माहिती घेतली. पक्षश्रेष्ठी देतील तो निर्णय मान्य करून सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून पक्षाच्या उमेदवाराला विजयी करावे, असे आवाहन केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस रोहिदास पिसाळ, तालुका अध्यक्ष दीपक ननावरे, शहर अध्यक्ष विजय ढेकाने, शुभदा नागपूरकर, रुपाली वनारसे, अमित वनारसे, सुनील साठे, प्रशांत नागपूरकर, सचिन घाटगे, दिलीप शिंदे, जितेंद्र पिसाळ, प्रदीप भोसले, अमित सोहनी यांच्यासह असंख्य महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.