पंढरपूर : राज्यातील सर्व महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन हे महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ‘उमेद’च्या माध्यमातून राज्यातील सर्व महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या माध्यमातून सर्व महिलांना लखपती दीदी बनवण्याची ग्वाही राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री तथ सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

सोलापूर येथील नॉर्थ कोर्ट मैदान येथे ग्रामविकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद सोलापूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आयोजित रुक्मिणी महोत्सव व मिनी सरस जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबसे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा परिषद सदस्य चेतन केदार, नगरसेविका रोहिणी तडवळकर, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जगताप आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री गोरे म्हणाले की, महिला बचत गटांनी स्वतः उत्पादित केलेल्या मालांचे वस्तूचे विक्री व प्रदर्शन करण्यासाठी हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून हा मिनी सरस जिल्हा रुक्मिणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महिलांची आर्थिक बळकटी व सक्षमीकरणासाठी हा महोत्सव घेण्यात येतो. उमेदच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्या, त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी उमेदच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात, असे त्यांनी सांगितले.

महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या मालाला चांगले पॅकिंग केले तर चांगला पैसा मिळतो. महिलांच्या उत्पादित मालाला हक्काची बाजारपेठ मिळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी उमेद मॉल मंजूर केला गेला आहे, अशी माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली. उमेद मॉलमुळे सोलापूर जिल्ह्यातील महिलांच्या उत्पादित वस्तूंसाठी बारा महिने हक्काची बाजारपेठ मिळणार आहे.

राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यात मुख्यमंत्री महोदयांनी असे मॉल मंजूर केले आहेत. तसेच गावामध्ये महिला बचत गटाच्या बैठकीसाठी कार्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या महोत्सवात महिला बचत गटांचे ८० स्टॉल लागलेले आहेत. तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या स्टॉलला भेट देऊन महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व समारोप प्रकल्प संचालक जगताप यांनी केले.