महाराष्ट्रातील घडामोडींचा झारखंडच्या निवडणुकीवर परिणाम?

झारखंड विधानभेच्या ८१ जागांकरिता निवडणूक होत असून, पहिल्या टप्प्यात १३ मतदारसंघांत येत्या रविवारी मतदान होईल.

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यांमध्ये अपेक्षित यश मिळालेले नसतानाच झारखंडमध्ये सत्ता कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान उभे ठाकले आहे, पण त्याच वेळी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा काँग्रेसने खुबीने वापर सुरू केला आहे. भाजपला सत्तेची कशी घाई झाली किंवा साऱ्या यंत्रणांचा कसा गैरवापर केला जातो हा काँग्रेसने प्रचाराचा मुद्दा केला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसने सत्तेकरिता कशी जातीयवादी पक्षांशी हातमिळवणी केली यावर भाजपकडून भर देण्यास सुरुवात केली.

झारखंड विधानभेच्या ८१ जागांकरिता निवडणूक होत असून, पहिल्या टप्प्यात १३ मतदारसंघांत येत्या रविवारी मतदान होईल. लोकसभा निवडणुकीत झारखंडमध्ये भाजपने १४ पैकी ११ जागा जिंकल्या. विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेत येण्याचा पक्षाचा प्रयत्न असला तरी अडथळ्यांची मालिका मोठी आहे.

भाजपला सत्तेची कशी घाई झाली आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. संख्याबळ नसतानाही सरकार स्थापण्याची झालेली घाई, मध्यरात्रीचे सत्तेचे नाटय़ यातून जनमानस भाजपच्या विरोधात निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. आदिवासीबहुल राज्यात हा संदेश दिला जात असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येते. भाजप सत्तेची कशी लालची आहे हे चित्र महाराष्ट्र आणि हरयाणातील घटनांवरून झारखंडमधील मतदारांसमोर उभे करण्यात येत आहे. याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास काँग्रेसच्या गोटातून व्यक्त केला जात आहे.

सत्तेकरिता काँग्रेसने धोरणांना तिलांजली देत शिवसेनेसारख्या पक्षाशी हातमिळवणी केली हा मुद्दा भाजपकडून अल्पसंख्याकबहुल भागांमध्ये करण्यास सुरुवात केली आहे. भाजप आणि काँग्रेसने महाराष्ट्रातील घडामोडींचा लाभ उठविण्याचा झारखंडमध्ये प्रयत्न सुरू केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jharkhand elections affect the affairs of maharashtra akp