राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महराज यांच्याविषयी बोलताना केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे गट तसेच राष्ट्रवादीनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपालांनी केलेल्या विधानावरून विरोधी पक्षांतर्फे ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली जाण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा इतिहासाच्या विद्रुपीकरणावर बोलताना राज्यपाल कोश्यारी आणि भाजपावर टीका केली आहे. महाराष्ट्र बंदचा निर्णय घ्यावाच लागेल, असे आव्हाड म्हणाले आहेत. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही आव्हाड यांनी टीका केली. वेगवेगळ्या भूमिका घेणे योग्य नाही. कालच्या सभेत जे बोलले त्यावर आगामी काळात कायम राहा, असे आव्हाड राज ठाकरे यांना उद्देशून म्हणाले. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> दिल्लीत पुन्हा श्रद्धा वालकरप्रमाणे खून! पतीला संपवून मृतदेहाचे तुकडे ठेवले शीतकपाटात

“हर हर महादेव चित्रपटात मनोविकृती दाखवण्यात आली आहे. इतिहासाचं विकृतीकरण दाखवण्यात आलं आहे. याच कारणामुळे मला काही लोकांकडून अपेक्षा होत्या. एकीकडे महापुरूषांबद्दल काहीही बोलू नका असे म्हणायचे आणि दुसरीकडे ज्या चित्रपटात इतिहासाचे विद्रुपीकरण देण्यात आले, त्या चित्रपटाला राज ठाकरे यांनी आवाज दिला. या चित्रपटात काय आहे, याबात राज ठाकरे यांना माहिती नव्हते का. तरीदेखील त्यांचे लोक हा चित्रपट मोफत दाखवत होते,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हेही वाचा >> महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरील चर्चेसाठी बोम्मई यांची दिल्लीवारी, मुकूल रोहतगींची घेणार भेट!

“आपल्याला कधीकधी निर्णय घ्यावे लागतात. इथे एक निर्णय आणि तिथे एक निर्णय असे चालत नाही. राज ठाकरे काल जे बोलले त्यावर त्यांनी कायम राहावे. चित्रपटासाठी वेगळी भूमिका, नाटकांसाठी वेगळी भूमिका, पुस्तकांसाठी वेगळी भूमिका आणि बोलताना वेगळी भूमिका असे चालत नाही. एकाच वेळी वेगवेगळ्या भूमिका घेता येत नाहीत. महाराष्ट्र शिवरायांचं विकृतीकरण, इतिहासाचं विद्रुपीकरण सहन करणार नाही. प्रत्येक मराठी माणसाच्या हे मनात हवं,” अशी रोखठोक भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी घेतली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad criticizes mns chief raj thackeray on chhatrapati shivaji maharaj comment and har har mahadev movie prd
First published on: 28-11-2022 at 14:34 IST