Premium

“…तेव्हा तुमच्या धर्मानं शिवरायांना राज्याभिषेक का नाकारला?” जितेंद्र आव्हाडांचा रायगडावरील सोहळ्यावर सरकारला सवाल!

जितेंद्र आव्हाड म्हणतात, “शिवरायांना राज्याभिषेक नाकारणारा तत्कालीन धर्म आम्ही स्वीकारायचा? लोक विचार…!”

jitendra awhad on shivrajyabhishek sohala
जितेंद्र आव्हाडांचं शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर राज्य सरकारकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दीपक केसरकर, खासदार उदयनराजे भोसले, खासदार सुनील तटकरे आदी नेतेमंडळी उपस्थित होते. या सोहळ्यावरून आता विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट केल्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

काय होतं अमोल मिटकरींचं ट्वीट?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी या सोहळ्यासंदर्भात ट्वीट करताना सनातन धर्माचा उल्लेख केला आहे. “ज्या सनातनी प्रवृत्तीने शिवरायांचा राज्याबिषेक नाकारला, त्यांनाच डोक्यावर घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सत्तेचा गैरवापर करून तिथीनुसार हा कार्यक्रम राबवलाय. महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता यांना चोख उत्तर देईल. तुम्ही रायगडाच्या पवित्र भूमीत सनातनी सत्तेचा उन्माद केलाय”, असं अमोल मिटकरींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाडांचा परखड सवाल!

दरम्यान, याच मुद्द्याच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आगपाखड केली आहे. “शिवाजी महाराजांना काय पसंत होतं, तेच रायगडावरून जाहीर व्हायला हवं होतं. तुम्हाला काय आवडतं आणि तुमच्या राजकारणासाठी काय हिताचं आहे, तुम्हाला कुठल्या जागा जास्त निवडून येण्यासाठी कुठल्या धर्माची मदत होईल तो धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म नव्हे. ज्यांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाला नकार दिला, ज्यांनी शिवरायांच्या मस्तकावर अंगठ्यानं कुमकुम तिलक केलं, ते सांगणार आता?” असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

“शिवरायांना राज्याभिषेक नाकारणारा तत्कालीन धर्म आम्ही स्वीकारायचा? लोक विचार करतील ना याबाबत! पहिला प्रश्न उभा राहील की मग तुमच्या त्या धर्मानं शिवरायांना राज्याभिषेक का नाकारला? याचं स्पष्टीकरण आधी महाराष्ट्राला द्या”, असंही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

Live Updates

Web Title: Jitendra awhad ncp slams shivrajyabhishek sohala 2023 bu shinde fadnavis government pmw